सरदार सरोवर धरणाला दारे बांधण्याबाबत मी स्वत: पंतप्रधान मनमोहन सिंग यांना २५ वेळा विनंती केली आहे तरी केंद्र सरकारने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले असून या सरकारला केवळ काका-पुतण्यांचीच चिंता आहे, अशी टीका गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केली.
राजकोटपासून ७५ किलोमीटरवर असलेल्या देवडा या सौराष्ट्र प्रांतातील गावात तीव्र पाणीटंचाई आहे. तेथे ‘सौराष्ट्र जलधारा ट्रस्ट’ने भदर धरणाजवळ ‘सौराष्ट्र नर्मदा जलअवतरण महायज्ञ’ आयोजित केला असून त्याप्रसंगी मोदी बोलत होते.
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि परसोत्तम रुपाला यांच्यासह मी पंतप्रधानांची वेळोवेळी भेट घेऊन ही मागणी केली होती पण त्यांनी दुर्लक्ष केल्याचे मोदी म्हणाले.  रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांच्या पुतण्याच्या सध्या गाजत असलेल्या रेल्वे गैरव्यवहाराचा थेट उल्लेख न करता मोदी म्हणाले, जर या धरणाला दारे बांधली तर महाराष्ट्राच्या पाणीटंचाईच्या प्रश्नावरही मात करता येऊ शकते. पण या सरकारला केवळ आपलीच सत्ता असलेल्या राज्यांची चिंता आहे आणि त्याहीपेक्षा काका-पुतण्यांची चिंता आहे.
कल्पसार प्रकल्पाच्या व्यवहार्यतेबाबतच्या अहवालाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असल्याने हा प्रकल्पही आता मार्गी लागेल. हा प्रकल्प पूर्ण झाला की सौराष्ट्राला पुढील शतकभराततरी पाणीटंचाई कधीच भेडसावणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
मोदी-राहुल लढा नाहीच
नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्या व्यापक दृष्टीकोनाच्या जवळपासही अन्य कोणी नेता फिरकूदेखील शकत नसून मोदी हे राहुलच्या तुलनेत कुठेच नसल्याने आगामी सार्वत्रिक निवडणुकीत त्यामुळेच ‘राहुल विरुद्ध मोदी’ असा लढा होऊच शकत नाही, अशी शेखी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी प्रेस ट्रस्टला दिलेल्या मुलाखतीत मिरवली आहे. राहुल हे देशाच्या नवरचनेसाठी काम करीत आहेत. देशाचे भवितव्य घडविण्याच्या त्या कामात प्रत्येक नागरिकाचा वाटा त्यांना हवा आहे. ही फेररचना राजकीय, आर्थिक आणि सामाजिक अशा सर्वच पातळ्यांवर साधण्याचे त्यांचे प्रयत्न असून हा दृष्टीकोन अन्य कोणत्याही नेत्यांत नाही, असे शिंदे म्हणाले.