काही दिवसांपूर्वीच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे निकाल लागले आणि त्यानंतर काही परीक्षार्थींच्या यशोगाथांनी सर्वांचच लक्ष वेधलं. आपल्या आयुष्यात काही ध्येय निश्चित करत त्याच दिशेने पावलं उचलणाऱ्या केरळच्या अशाच एका तरुणाने साऱ्या देशाचं लक्ष वेधलं आहे. रितसर शालेय शिक्षणाअभावीही टी शाहिद याने आपल्या जिद्दीच्या बळावर केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देत त्यात यश संपादन केलं. मदरशांमध्ये शिकवणाऱ्या २८ वर्षीय टी शाहिद हा मुळचा केरळच्या कोझिकोडे येथील तिरुवल्लूर गावातील असून, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सहाव्या प्रयत्नात यशस्वी होत त्याने ६९३वा क्रमांक मिळवला आहे.

शाहिदचे वडील अब्दुल रहमान मुसलियार हेसुद्धा मदरशांमध्ये शिक्षक म्हणून काम पाहात होते. त्यामुळे शाहिदलाही मनाविरुद्ध याच मार्गावर जात मदरशांमध्ये शिक्षण घ्यावं लागलं. कप्पड येथे एका अनाथ आश्रमाकडून चालवण्यात येणाऱ्या मदरशामध्ये त्याने प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यातच त्याच्यापुढे घरातील आर्थिक संकटही आ वासून उभं होतं. १२ वर्षे मदरशांमध्ये शिक्षण घेतल्यानंतर शाहिदला ‘हस्नी’ ही पदवी देण्यात आली. ज्यामुळे त्याने पुढे मदरशांमध्ये शिक्षकाचं काम सुरु केलं. ‘हस्नी’ ही पदवी मिळवण्यासाठीचा अभ्यास करतेवेळीच त्याने दुसरीकडे दहावी आणि बारावीच्या परीक्षा देत इंग्रजी विषयात शासनकृत पदवी प्राप्त केली. हे सर्व मुक्त विद्यापीठांच्या मदतीने शक्य झालं.

जिद्दीच्या बळावर उत्तुंग शिखरं गाठता येतात हे शाहिदने सिद्ध केलं आहे. ‘२०१० ते २०१२ मध्ये मी ६००० रुपयांच्या वेतनावर कन्नूर येथील मदरशामध्ये शिक्षकाचं काम केलं’, असं म्हणत शाहिदने त्याच्या प्रवासाविषयी सांगितलं. २०१२ मध्ये रितसर पदवी मिळाल्यानंतर त्याने इंडियन युनियन मुस्लिम लीगतर्फे (IUML) चालवण्यात येणाऱ्या ‘चंद्रीका’ या मल्याळम दैनिकामध्ये पत्रकाराची नोकरी केली. ज्यामुळेच त्याचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलला. याविषयीच सांगताना शाहिद म्हणाला, ‘तिथे काम करण्यास लागल्यापासून मी दैनंदिन आयुष्यातील काही घडामोडींविषयी वाचण्यास सुरुवात केली. तब्बल १२ वर्षे मदरशांमध्ये शिक्षण घेतल्यामुळे जगाकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन काही गोष्टींपर्यंतच सिमीत होता. पण, पत्रकार म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केल्यानंतर बाहेरच्या जगाकडे पाहण्याची एक व्यापक दृष्टी मला मिळाली.’ याचवेळी फक्त अमुक एका धर्मापुरताच आपल्या शिक्षणाचा वापर न करता कक्षा रुंदावण्याचा विचार शाहिदच्या मनात घर करुन गेला.

वाचा : जेव्हा चहा विक्रेत्याने पहिल्यांदाच आपल्या मुलांना नेलं मॅकडोनल्डमध्ये

मल्याळम साहित्य या विषयाचा अभ्यासक्रमात सहभाग असणाऱ्या शाहिदला दिल्लीत इंडियन युनियन मुस्लिम लीगतर्फे (IUML) चालवण्यात येणाऱ्या शिकवणी वर्गांमुळे बराच फायदा झाला. मुळात त्या शिवकणी वर्गांच्या दिवसांमध्ये मला बऱ्याच गोष्टींविषयी जाणून घेण्याची संधी मिळाली, जी मदरशांच्या शिक्षणामधून मिळाली नव्हती, असं खुद्द शाहिदनेच सांगितलं.

आजच्या घडीला शाहिदने केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेत यश संपादन केलं असून, आता पुढच्या वाटचालीसाठी तो आशावादी आहे. पण, तरीही मदरशांमध्ये मिळालेली शिकवण मात्र तो विसरलेला नाही. मदरशांविषयी इतरांच्या मनात असणारा चुकीचा दृष्टीकोन मिटवण्यासाठी तो प्रयत्नशील आहे. त्याशिवाय केरळच्या एका मदरशातील सर्वसामान्य विद्यार्थी, शिक्षकही केंद्रीय लोकसेवा आयोगात आपला ठसा उमटवू शकतो, हा महत्त्वाचा संदेशही शाहिद सर्वांनाच देऊ इच्छितो.