उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ आणि केशवप्रसाद मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या लोकसभेच्या दोन जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला असलेल्या गोरखपूरमध्ये समाजवादी पार्टीचे उमेदवार प्रविण निषाद विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपा उमेदवार उपेंद्र दत्त शुक्ला यांचा २१ हजार मतांनी पराभव केला. योगींसाठी हा मोठा धक्का आहे. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या मतदारसंघात सपा उमेदवार नरेंद्र प्रताप सिंह पटेल यांनी भाजपा उमेदवार कौशलेंद्र सिंह पटेल यांच्यावर ५९ हजारपेक्षा जास्त मतांनी विजयी मिळवला.

उत्तर प्रदेशप्रमाणे बिहारमध्येही लोकसभा पोटनिवडणुकीत लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने भाजपाला झटका दिला. राजद उमेदवार सरफराझ आलमने भाजपाच्या प्रदीप कुमार सिंह यांचा ६१,७८८ मतांनी पराभव केला. भाजपा उमेदवाराला ४ लाख ४७ हजार ५४६ मते मिळाली. राजद उमेदवाराला ५ लाख ९ हजार ३३४ मते मिळाली.

योगी आदित्यनाथ यांची उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी तर केशवप्रसाद मौर्य यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर दोघांनीही खासदारकीचा राजीनामा दिला होता. योगी आदित्यनाथ हे गोरखपूर तर केशवप्रसाद मौर्य हे फुलपूरमधून लोकसभेवर निवडून गेले होते. या दोन्ही जागांसाठी रविवारी मतदान झाले होते. फुलपूरमध्ये ३८ टक्के तर गोरखपूरमध्ये ४७ टक्के मतदान झाले होते. गोरखपूरमधून भाजपाकडून उपेंद्र दत्त शुक्ला, काँग्रेसकडून सुरीता करिम, समाजवादीकडून प्रवीण निशाद रिंगणात होते. तर फुलपूरमधून भाजपाकडून कौशलेंद्र सिंह पटेल, समाजवादी पक्षाकडून नागेंद्र प्रतापसिंह पटेल तर काँग्रेसकडून मनीष मिश्रा रिंगणात होते.

पोटनिवडणुकीत बहुजन समाज पक्षाने समाजवादी पक्षाला पाठिंबा जाहीर करत नवीन राजकीय समीकरणाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. बिहारमधील अरारिया या लोकसभा मतदारसंघातील तसेच बभुआ आणि जेहनाबाद या विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक पार पडली. या दोन्ही जागांसाठी मतमोजणी सुरु आहे. नितीशकुमार यांनी भाजपाशी युती केल्यानंतरची ही निवडणूक आहे.

LIVE:

> गोरखपूर आणि फुलपूरमध्ये आघाडी घेतल्यानंतर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

> अररिया: बिहारमधील अररिया येथील पोटनिवडणुकीतही भाजपा उमेदवार पिछाडीवर, राजद उमेदवार आघाडीवर

> गोरखपूर: समाजवादी पक्षाचे प्रवीणकुमार निषाद १५ हजार मतांनी आघाडीवर

> गोरखपूर: चौथ्या फेरीतील मतमोजणीनंतर समाजवादी पक्षाचे प्रवीणकुमार आघाडीवर, योगी आदित्यनाथांना हादरा, भाजपाच्या गोटात चिंतेचे वातवरण

>गोरखपूर: भाजपाचे उपेंद्र दत्त शुक्ला १५, ५७७ आघाडीवर, समाजवादी पक्षाचे प्रवीणकुमार दुसऱ्या स्थानी.

> अरारिया: मतमोजणीतील दुसऱ्या फेरीनंतर भाजपाने आघाडी घेतल्याने राष्ट्रीय जनता दलाला धक्का