उत्तराखंडममध्ये बुधवारी दुपारी हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं. उत्तरकाशीमध्ये हे हेलिकॉप्टर कोसळलं. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. वीजेच्या तारांना धडकून हे हेलिकॉप्टर कोसळलं. मदत साहित्याचे पूरग्रस्तांमध्ये वाटप करुन परतत असताना मोलदीमध्ये या हेलिकॉप्टरला अपघात झाला. उत्तरकाशीचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देवेंद्र पटवाल यांनी ही माहिती दिली.

मदत कार्यामध्ये गुंतलेल्या इंडो-तिबेटीयन पोलिसांनी हे हेलिकॉप्टर कोसळताना पाहिले व लगेच घटनास्थळाकडे धाव घेतली. मुसळधार पाऊस आणि ढगफुटीमुळे उत्तराखंडच्या काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यामध्ये ३५ जणांचा मृत्यू झाला आहे.

उत्तरकाशीमध्ये नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. २०१३ मध्ये उत्तराखंडला पुराने तडाखा दिला होता. त्यामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. मोठया प्रमाणावर वित्तहानी झाली होती.