News Flash

सव्वा लाख रिक्त पदे रेल्वे अपघातांच्या मुळाशी

कर्मचारी कपातीची सर्वाधिक कुऱ्हाड सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या विभागांवरच आहे.

गँगमनच्या ४१ हजार, तर इंजिनीअर्सच्या ४७ हजार रिकाम्या जागांनी सुरक्षेशी तडजोड

कानपूरजवळील भीषण अपघाताने रेल्वेच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. सरासरी ७५ टक्के रेल्वे अपघात मानवी चुकांमुळे होत असतानाच सुरक्षेसंबंधातील तब्बल सव्वा लाख रिक्त पदे या अपघातांच्या मुळाशी असल्याचे स्पष्ट दिसते आहे. यामध्ये इंजिनीअर्सच्या सुमारे ४६ हजार आणि गँगमनच्या सुमारे ४१ हजार जागा प्रदीर्घ काळ रिक्त राहिल्याने सुरक्षेशी एका अर्थाने तडजोड झाल्याचेही दिसते आहे.

रेल्वेशी संबंधित असलेल्या स्थायी समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये रेल्वे मंत्रालयाने रिक्त जागांचा सविस्तर तपशील दिला आहे. १  एप्रिल २०१६ नुसार, रेल्वेमध्ये एकूण २ लाख १७ हजार ३६९ जागा रिक्त आहेत, पण त्यात सुरक्षेसंदर्भातील रिक्त पदांची संख्या १ लाख २२ हजार ७६३ इतकी आहे. म्हणजे कर्मचारी कपातीची सर्वाधिक कुऱ्हाड सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या विभागांवरच आहे.

रिक्त पदांमध्ये सर्वाधिक संख्या आहे ती इंजिनीअर्सची आणि त्यापाठोपाठ गँगमनची. सिग्नलिंग, इलेक्ट्रिकल यांसारख्या विभागांमध्ये इंजिनीअर्सची गरज २ लाख ७५ हजाराइतकी आहे. पण फक्त २ लाख २८ हजार इंजिनीअर्स सध्या आहेत. गँगमन हे तर सुरक्षेचा कणा. नेमकी त्यांच्याच रिक्तपदांची संख्या मोठी आहे. २ लाख ४७ हजार गँगमनची आवश्यकता असताना फक्त २ लाख ६ हजार गँगमन कार्यरत आहेत. हे प्रमाण जवळपास १७ टक्क्यांच्या आसपास आहे. याशिवाय गार्ड (१० हजार), इलेक्ट्रिक सहायक (६५७४), केबिनमन (१०१६), की मन (२४३४), गेट मन (१०६३) आदी महत्त्वाच्या पदांवरही पुरेसे मनुष्यबळ नाही. रेल्वे पोलिसांची संख्याही सुमारे पंधरा टक्क्यांनी कमी आहे.

रेल्वेच्या अवाढव्य सुरक्षेची जबाबदारी वाहून नेण्यासाठी सुमारे साडेसात लाख कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे; पण सध्या फक्त ६ लाख २३ हजारच कर्मचारी गाडा ओढत आहेत. यामुळे कामाचा अधिक बोजा, पुरेशी विश्रांती आणि वेळेवर रजा मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांवर अधिक ताण आहे. त्यातून सुमारे ७५ टक्के अपघातांना मानवी चुका कारणीभूत असल्याचे दिसते आहे.

एकूण साडेबारा लाख कर्मचारी असलेल्या रेल्वेला या रिक्त जागांची संख्या फारशी गंभीर वाटत नाही. ‘एवढय़ा मोठय़ा विभागामध्ये काही जागा कायम रिक्त राहणारच. रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सातत्याने चालू असते. मात्र कार्यान्वयन आणि सुरक्षेसंदर्भातील कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी नसल्याची वस्तुस्थिती आहे,’ असे मंत्रालयाने म्हटले आहे. पंचवीस हजार जागा भरण्याची प्रक्रिया विविध टप्प्यांवर असल्याची माहितीही मंत्रालयाने स्थायी समितीला दिली आहे.

अपघातग्रस्त गाडीतील बेपत्ता प्रवाशांचा नातेवाईकांकडून व्याकूळ शोध

अपघातग्रस्त इंदूर-पाटणा एक्सप्रेसमधील दुर्दैवी प्रवाशांचे व्याकूळ नातेवाईक अद्यापही त्यांच्या कुटुंबांपैकी अनेकांना भेटू शकलेले नसून, अपघाताच्या दुसऱ्या दिवशी ते आपल्या प्रियजनांचा सैरभैर होऊन शोध घेत होते.

पहाटेच्या वेळी झालेल्या या अपघातात आपले नातेवाईक वाचले की ठार झाले याचा काहीजणांना शोध लागला, मात्र इतर अनेकजण मनात भीती बाळगून त्यांना शोधण्याचा अथक प्रयत्न करत होते.

मला जे कुणी सापडले, ते सर्व मरण पावले आहेत – माझा भाऊ, माझी मोठी मेहुणी, मुलगी.हे सर्व. माझी आई अद्याप सापडलेली नसून, तीही मला याच अवस्थेत सापडेल अशी मला भीती वाटते, असे निर्मल वर्मा म्हणाले. तेही आधी लग्नासाठी कुटुंबासोबत जाण्याची योजना आखली होती, मात्र त्यांना सुटी न मिळाल्यामुळे त्यांनी नंतर जाण्याचे ठरवले होते.

मी माझ्या भावाचा शोध घेत आहे. कुणास ठाऊक, कदाचित त्याने जागा बदलली असावी.आम्ही सगळीकडे शोध घेतला आहे, असे रामानंद तिवारी म्हणाले.

मला माझ्या भावाबद्दल काहीही कळलेले नसून आम्ही सर्व हॉस्पिटल्स पालथी घातली आहेत. तो गाडीच्या डब्यात अडकला असावा अशी मला भीती वाटते, असे अपघातातून बचावलेला एकजण म्हणाला.

एका व्यक्तीच्या दोन बहिणी या गाडीत होत्या. अपघाताबद्दल कळताच तो त्याच्या गावावरून कानपूरला निघाला. मात्र एक बहीण ठार झाल्याचे व दुसरी बेपत्ता असल्याचे त्याला आढळले. रात्रभर तो व्याकूळ होऊन रुग्णालयांमध्ये बहिणीचा शोध घेत फिरत होता.

ठार झालेल्या १४३ जणांपैकी मृतदेह बिहार, मध्यप्रदेश व उत्तरप्रदेशात पाठवण्यात आले असून, दोनशेहून अधिक जखमींना कानपूर ग्रामीण भागातील निरनिराळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यापैकी काहींची अजूनही त्यांच्या कुटुंबीयांशी भेट झालेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 1:07 am

Web Title: veacnt post in railway is may reason for indore patna express derail
Next Stories
1 मुलायमसिंह यांच्या नकारानंतर उत्तर प्रदेशात आरएलडी-जद(यू)-बीएस-४ आघाडी
2 २००० रुपयांच्या नोटा जारी करण्याचा निर्णय बेकायदेशीर, काँग्रेसचा आरोप
3 निश्चलनीकरणाच्या विरोधकांना पंतप्रधानांची धमकी, ममतांचा आरोप
Just Now!
X