जम्मू-काश्मीरचे रहिवासी असलेले माजी आयएएस अधिकारी आणि ‘जम्मू आणि काश्मीर पिपल्स मुवमेंट’ पक्षाचे सर्वेसर्वा असणाऱ्या शाह फैजल यांनी कलम ३७० च्या मुद्द्यावरुन सरकारवर टिका केली आहे. जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द करणे आणि जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याच्या सरकारच्या निर्णयावर फैलज यांनी फेसबुक पोस्टमधून टिका केली आहे. “जम्मू काश्मीरमधील लोक सर्व काही गमावून बसले असून आता लढाई सुरु ठेवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही” असं फैलज यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे.

फैजल यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये काय प्रतिक्रिया उमटत आहेत याबद्दल सांगितले आहे. “लोकांना या निर्णयाचा धक्का बसला असून ते सुन्न झाले आहेत. या निर्णयाचा काय परिणाम होणार आहे याचा अंदाज काश्मीरमधील जनतेला लावता येत नाही. जे काही गमावले आहे त्याचं दु:ख सर्वांना झालं आहे. कलम ३७० बद्दल मी येथील स्थानिकांबरोबर चर्चा केली त्यावेळी त्यांनी हा निर्णय म्हणजे राज्याचे नुकसान असल्याचे मत व्यक्त केले. अनेकांनी या निर्णयाचे दु:ख झाल्याचे म्हटले आहे. हा निर्णय म्हणजे मागील ७० वर्षात भारताने येथील लोकांचा केलेला हा सर्वात मोठा विश्वासघात आहे अशा दृष्टीकोनातून याकडे पाहिले जात आहे,” असं फैजल आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

“ज्या स्थानिक नेत्यांना अटक झालेली नाही त्यांनी वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून शांतता कायम राखण्याचे विनंती स्थानिकांना केली आहे. या निर्णयानंतर होणाऱ्या हिंसेत आठ ते दहा हजार जणांचा नरसंहार होईल आणि सरकार त्यासाठी तयार आहे अशी चर्चा इथे आहे. त्यामुळेच कोणालाही या नरसंहाराची संधी देता कामा नये असं आमची विवेकबृद्धी आम्हाला सांगते. या निर्णयाला उत्तर देण्यासाठी आपण जिवंत रहायला हवे असं मला वाटतं,” असं फैलज यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“कोणत्याही अप्रिय घटनेला सामोरे जायचे नसेल तर काश्मीर खोऱ्यात येऊ नका. माझ्या ओळखीतील एका व्यक्तीला कोणीतरी आता आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ अशी धमकी दिल्याचे मी ऐकले. अशाच प्रकारे स्थानिकांना डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र काश्मीरमधील लोक शांत आहेत ही जमेची बाजू आहे”, असं फैलज पोस्टमध्ये म्हणतात.

नक्की वाचा >> काश्मीरमध्ये सध्या नेमकं काय चाललंय.. जाणून घ्या

केंद्र सरकारने अनुच्छेद ३७० रद्द करत जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याच्या निर्णयावरही फैलज यांनी टिका केली आहे. “आमचा इतिहास आणि आमची ओळख दाबून टाकणारा हा कायदा घटनाविरोधी आहे. आम्ही सर्व विरोधीपक्ष एकत्र आहोत. आम्ही एकत्रच या कायद्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाणार असून हा अन्यायकारक कायदा बदलण्याची आम्ही मागणी करणार आहोत,” असं फैलज यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“भारत सरकारच्या या निर्णयावर आंतररष्ट्रीय समुदायाने कानाडोळा केला आहे. मला त्यांच्याकडून काहीच अपेक्षा नाही. सर्वात दु:खद गोष्ट ही आहे की आमच्याकडून दिवसाढवळ्या जी गोष्ट काढून घेण्यात आली आहे ती गोष्ट आम्हाला परत केवळ नरेंद्र मोदी आणि अमित शाहच देऊ शकतात. मात्र जे गमावलंय त्याबद्दल विचार करण्यात अर्थ नाही. आम्ही ही लढाई कायम ठेवू हा विश्वास वगळता इतर सर्व गोष्टी आम्ही गमावल्या आहेत. पण आम्ही नक्कीच ही लढाई सुरु ठेऊ,” असा विश्वास फैजल यांनी या पोस्टमधून व्यक्त केला आहे.

फैजल यांनी जमावबंदीमध्ये काश्मीरमधील सध्याची परिस्थिती कशी आहे यासंदर्भातही या पोस्टमध्ये सविस्तर माहिती दिली आहे.