कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींच्या डोसचा पुरेसा पुरवठा होईपर्यंत १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण करता येणार नाही, असं महाराष्ट्र सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे. १ मे पासून या वयोगटासाठी प्राथमिक स्वरूपात एखाद्या केंद्रावर लसीकरण होईल असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. या पार्श्वभूमीवर आता पश्चिम बंगाल राज्याने देखील महाराष्ट्राच्या पावलावर पाऊल ठेवत निर्णय घेतला आहे. “जेव्हा राज्याला लसीचे डोस पुरवले जातील तेव्हाच १८ ते ४४ वयोगटातल्या नागरिकांचं लसीकरण राज्यात केलं जाईल”, असं पश्चिम बंगाल सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र, यासोबतच ४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण आधीप्रमाणेच सुरू राहील, असं देखील सांगण्यात आलं आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये देखील येत्या १ मेपासून तिसऱ्या टप्प्यातलं लसीकरण सुरू होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

महाराष्ट्रात लसीकरणाची परिस्थिती…

Piyush Goyal on Elon Musk Tesla
टेस्लाचा प्रकल्प महाराष्ट्रात की गुजरातमध्ये? पियुष गोयल यांचं ‘मनोज कुमार’ स्टाइल हटके उत्तर
Akola Lok Sabha, vote division in Akola,
अकोल्यात मतविभाजन कोणाला फायदेशीर ठरणार ?
nashik lok sabha,
नाशिकमध्ये महायुतीत अचानक शांतता
25 prominent politicians joined BJP
आधी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ‘कलंकित’; भाजपमध्ये येताच ‘चकचकीत’

लसींचा पुरेसा पुरवठा होत नसल्यामुळे महाराष्ट्र सरकारने याआधीच हा निर्णय जाहीर केला आहे. “१ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर अगदी प्राथमिक स्वरूपात निवडक लसीकरण केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातल्या काही नागरिकांना लस देता येऊ शकेल. पण नोंदणी करून ज्यांना लसीकरणासाठी अपॉइंटमेंट मिळेल, त्यांनीच संबंधित केंद्रावर जायला हवं. सुरुवातीला जिल्ह्यात एखादं केंद्र असू शकेल. त्यामुळे ज्यांची नोंदणी होईल, त्यांनीच केंद्रावर जावं. लस अतिशय नाममात्र स्वरूपात आहे”, असं राजेश टोपेंनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना नमूद केलं.

“महाराष्ट्रात १ मेपासून लसीकरण सुरू होऊ शकेल, पण…” राजेश टोपेंनी केले सूतोवाच!

मतदान होताच पश्चिम बंगालमध्ये निर्बंध लागू

पश्चिम बंगालमध्ये एकीकडे निवडणूक निकालांचे वेध लागलेले असताना दुसरीकडे राज्यात करोनाचे लॉकडाउनसदृश्य कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. पश्चिम बंगाल सरकारकडून शुक्रवारी यासंदर्भातले आदेश काढण्यात आले असून त्यानुसार राज्यात सर्व प्रकारच्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी असणार आहे. सर्व शॉपिंग मॉल, ब्युटी पार्लर, चित्रपटगृहे, रेस्टॉरंट, बार, क्रीडा संकुले, जिम, स्पा, स्विमिंग पूल हे पूर्णवेळ बंद राहणार आहेत. मेडिकल, वैद्यकीय उपकरणांची दुकाने, किराणा दुकाने आणि होम डिलिव्हरी सेवा या काळात सुरू राहणार आहेत. याशिवाय, निवडणूक निकालाच्या दिवशी निवडणूक आयोगाने जारी केलेल्या नियमावलीतील निर्बंध लागू असणार आहेत, असं देखील राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

काय आहेत निवडणूक आयोगाचे नियम?

निवडणूक आयोगाने जारी केलेल्या नियमावलीनुसार विजयी उमेदवाराला प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी सोबत फक्त दोन व्यक्तींना नेता येणार आहे. तसेच, विजयी मिरवणुकांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. त्यासोबतच, मतमोजणी केंद्रांच्या आसपास विनाकारण गर्दी न करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.