09 August 2020

News Flash

चिदंबरम यांची डोकेदुखी ठरलेले INX मीडिया प्रकरण आहे तरी काय ?

एअरसेल- मॅक्सिस प्रकरणातही चिदंबरम पिता-पुत्रांवर आरोप झाले होते.

(संग्रहित छायाचित्र)

आयएनएक्स गैरव्यवहार प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना यांना अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मंगळवारी रात्रीपासून सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) पथक त्यांच्या मागावर आहे. या प्रकरणात चिदंबरम यांनी ३०५ कोटीं रुपयांची लाच घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. हे प्रकरण नेमके काय आहे याचा घेतलेला हा आढावा….

– चिदंबरम यांच्यावर आयएनएक्स मीडिया प्रकरणात भ्रष्टाचार आणि आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आहे.

– आयएनक्स मीडिया ही पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जीची कंपनी आहे. हे दोघेही सध्या शीना बोरा हत्याप्रकरणात तुरुंगात आहेत.

– आयएनएक्स मीडियामधील परकीय गुंतवणुकीचा प्रस्ताव परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने (एफआयपीबी) स्वीकारला होता. त्यापाठोपाठ अर्थमंत्रालयाने १८ मार्च २००७ रोजी ४ कोटी ६४ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीला मान्यता दिली होती.

– आयएनएक्स मीडियाने नियमांचे उल्लंघन करत आयएनएक्स न्यूज या नवीन कंपनीत २६ टक्के गुंतवणूक करताना परकीय गुंतवणूकदारांना समभागांची विक्री ८०० रुपये दराने केली. यामुळे फक्त ४. ६२ कोटी रुपयांची परवानगी असताना परकी गुंतवणूक ३०५ कोटींपर्यंत पोहोचली.

– प्राप्तिकर खाते आणि महसूल विभागाने या प्रकरणात कंपनीला नोटीसही बजावली. मात्र, त्यावेळी कार्ती चिदंबरम कंपनीच्या मदतीला धावून आले, असे सांगितले जाते. त्यांनी वडील पी. चिदंबरम यांच्या पदाचा वापर करत कंपनीला नव्याने परवानगी मिळवून दिली. त्यावेळी पी. चिदंबरम हे केंद्रीय अर्थमंत्री होते.

– या मोबदल्यात कार्ती यांच्याशी संबंधीत कंपन्यांमध्ये साडे तीन कोटींहून अधिक रक्कम देण्यात आल्याचा आरोप आहे.

– सीबीआयने या प्रकरणात मे २०१७ मध्ये कार्ती चिदंबरम, त्यांची चेस मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनी, तसेच अॅडव्हॉन्टेज स्ट्रॅटेजिक कन्सल्टिंग कंपनीच्या पद्मा विश्वनाथन, आयएनएक्स मीडियाचे संचालक पीटर व इंद्राणी मुखर्जी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

– ईडीने २०१८ मध्ये या संबंधी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता

– पी. चिदंबरम, त्यांची पत्नी नलिनी व मुलगा कार्ती चिदंबरव हे तिघेही वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. नलिनी यांच्यावर पश्चिम बंगालमध्ये गाजलेल्या शारदा चिटफंड घोटाळ्यात कोट्यवधी रुपये घेतल्याचा आरोप आहे. तर कार्ती यांच्यावर राजस्थान रुग्णवाहिका गैरव्यवहाराप्रकरणी आरोप झाले होते. एअरसेल- मॅक्सिस प्रकरणातही चिदंबरम पिता-पुत्रांवर आरोप झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2019 11:54 am

Web Title: what is inx media case nck 90
Next Stories
1 ‘बिकीनी एअरलाइन्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंपनीकडून भारतीयांना ९ रुपयांत विमान तिकीट
2 सुप्रीम कोर्टाचा चिदंबरम यांना तत्काळ दिलासा नाही; अटकेची टांगती तलवार कायम
3 ‘अब की बार उस पार’; काय म्हणाले भाजपाचे मंत्री ?
Just Now!
X