मोदी सरकार येण्याची शक्यता माध्यमांनी वर्तविल्यानंतर भारतीय जनता पक्षातील घडामोडींना वेग आला आहे. अशातच मोदींच्या संभाव्य मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार यावरून विविध चर्चा रंगत असताना, सर्वाधिक लक्ष लालकृष्ण अडवाणी आणि सुषमा स्वराज यांचे काय होणार, याकडे लागले आहे. अडवाणी आणि स्वराज यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार की त्यांना इतर कोणती जबाबदारी दिली जाणार, यावरही राजकीय विश्लेषक विविध अंदाज वर्तवत आहेत.
संभाव्य मंत्रिमंडळ आणि सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी निमंत्रित करण्यात न आल्याने सुषमा स्वराज नाराज असल्याचे वृत्त बुधवारी माध्यमांनी दिले होते. मात्र, खुद्द स्वराज यांनी हे वृत्त फेटाळून लावले. स्वराज यांचे बुधवारी भोपाळमध्ये आगमन झाले. तिथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले. भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह आणि पक्षाचे नेते नितीन गडकरी यांनी बुधवारी सकाळीच दिल्लीमध्ये सुषमा स्वराज यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर बुधवारी संध्याकाळी राजनाथसिंह, गडकरी, अरूण जेटली यांनी गांधीनगरमध्ये जाऊन मोदींची भेट घेतली. या भेटीमध्ये मतमोजणीनंतर पक्षाचा पुढील कार्यक्रम काय असेल, यावर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
अडवाणी यांना लोकसभेचे अध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता काही माध्यमांनी वर्तविली आहे. अडवाणी यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता अत्यंत कमी असून त्यांना इतर महत्त्वाचे पद दिले जाण्याची शक्यताही वर्तविण्यात येते आहे.