देशामध्ये महाराष्ट्रात करोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यातुलनेत मध्य प्रदेशात Covid-19 रुग्णांची संख्या कमी आहे. पण मध्य प्रदेशात करोना व्हायरसमुळे मृत्यूचे प्रमाण महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. महाराष्ट्राच्या खालोखाल तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये करोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण आहेत. पण महाराष्ट्राच्या तुलनेत त्या राज्यांमध्ये तामिळनाडूत ०.९६ टक्के आणि दिल्लीमध्ये १.६७ टक्के मृत्यूचे प्रमाण आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

देशात केरळमध्ये Covid-19 चा पहिला रुग्ण सापडला. पण तिथे या आजारामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अवघे ०.६ टक्के आहे. देशातील प्रत्येक राज्यामध्ये रुग्ण संख्येच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण वेगवेगळे का आहे? त्यामागे काय कारण आहे ते समजून घेऊया.

सार्वजिक आरोग्य आणि एपिडेमियोलॉजी तज्ज्ञांनी सांगितले की, असे ठोस कारण सांगता येणार नाही. पण ज्या राज्यांमध्य मोठया प्रमाणावर चाचण्या सुरु आहेत. तिथे मृत्यूचे प्रमाण कमी आहे. कारण Covid-19 ची सौम्य किंवा लक्षणे न दिसलेल्या रुग्णांवरही उपचार सुरु होत आहेत. काही वेळा करोना व्हायरस शरीरात असूनही त्याची लक्षणे दिसत नाहीत.

सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मृत्यूदर जास्त असू शकतो. पण एकदा गंभीर प्रकरणे कशी हाताळायची त्याची कल्पना आल्यानंतर मृत्यूचा आकडा कमी होईल असे तज्ज्ञ सांगतात. करोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूच्या बातम्यांमुळे सौम्य लक्षणे असणारे सुद्धा आता रुग्णालयात धाव घेत आहेत. त्यामुळे ज्यांना बाधा झाली आहे अशा Covid-19 रुग्णांची संख्या वाढतेय तर वेळीच उपचार झाल्यामुळे दुसऱ्या बाजूला मृत्यूचे प्रमाणही कमी होत आहे असे तज्ज्ञांचा निष्कर्ष आहे.