करोनामुळे सध्या देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे रस्त्यावंर खासगी वाहनांना प्रवास करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. अशातच एका ५० वर्षीय महिलेने आपल्या आजारी मुलाला भेटण्यासाठी सहा राज्यांमधून २७०० किमीचा प्रवास केल्याची घटना समोर आली आहे. महिलेचा मुलगा सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) जवान असून जोधपूर येथे तैनात आहे. आजारी असल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

प्रवासात महिलेसोबत त्यांची सून आणि अजून एक नातेवाईक होते. हा प्रवास करण्यासाठी त्यांना तीन दिवस लागले. शीलम्मा वसन असं या महिलेचं नाव आहे. पीटीआयशी बोलताना त्यांनी सांगितलं आहे की, “आपला मुलगा अरुण कुमार यांना स्नायूंचा दाह होत होता. सध्या त्याची प्रकृती चांगली आहे. देवाच्या कृपेने आम्ही कोणत्याही अडचणीविना इथपर्यंत पोहोचलो.

जोधपूरमधील एम्स रुग्णालयतील डॉक्टरांनी कुटुंबाला अरुण कुमार यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली होती. यानंतर त्यांनी लगेच प्रवासाला निघण्याची तयारी केली. केरळमधून त्यांनी आपला प्रवास सुरु केला होता. केरळमधून प्रवास करत तामिनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरातमार्ग ते राजस्थानमध्ये पोहोचले. प्रवास करण्यासाठी कुटुंबाला केंद्रीय मंत्री व्ही मुरलीधरन, मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांचं कार्यालय आणि काँग्रेस नेते ओमेन चंडी यानी मदत करत आवश्यक ते पास मिळवून दिले होते.

विश्व हिंदू परिषदेने कुटुंबाला गाडी आणि वाहनचालकाची व्यवस्था करुन दिली. यासाठी त्यांनी कसलेही पैसे घेतले नाहीत. अरुण कुमार फेब्रुवारीत आपल्या घरी आले होते. परतल्यानंतर मात्र ते आजारी पडले होते. यावेळी त्यांनी आपली आई आणि पत्नीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. अरुण कुमार यांना एक वर्षाचा मुलगा असून तो केरळमध्येच आहे.