भाजपाचे बंडखोर नेते यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी स्वत:ला पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्याचे सांगणाऱ्या सिन्हा यांनी ट्विटवर मोदींनी प्रवासी भारतीय दिवसा निमित्त केलेल्या भाषणावरून नाराजी जाहीर केली आहे. वाराणसी येथे मंगळवारी १५ व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनात मोदी सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. प्रवासी भारतीय दिवसाच्या वेळी राजकारणावर मोदींनी भाष्य करणे खूप चुकीचे होते, असे ट्विट त्यांनी केले आहे.

१५ व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनास मंगळवारी सुरूवात झाली. जगभरात स्थिरावलेल्या तुम्हा सर्व भारतीयांशी संवाद साधण्याचे हे अभियान अटलबिहारी वाजपेयी यांनी सुरू केले होते. अटलजी गेल्यानंतर हे पहिलेच प्रवासी भारतीय संमेलन आहे, असे मोदी म्हणाले.

त्याचबरोबर त्यांनी केंद्र सरकारच्या यशाची माहिती देताना काँग्रेसवर टीकास्त्र सोडले होते. मागील साडेचार वर्षांत आमच्या सरकारने ७ कोटी असे बनावट लोकांना व्यवस्थेतून हटवले आहेत ज्यांचा कधी जन्मच झाला नव्हता. हे ७ कोटी लोक असे होते जे फक्त कागदावरच होते आणि सरकारी सेवांचा लाभ घेत होते.