भारतविरोधी कारवाया करणाऱ्या इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या यासिन भटकळ हैदराबाद येथील कारागृहातून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या या कारागृहातून यासिनने आत्तापर्यंत त्याच्या पत्नीला अनेकदा फोन केले आहेत. आपण सिरीयाची राजधानी असलेल्या दमिश्कमधील काही लोकांच्या संपर्कात असून हे लोक मला कारागृहातून पळून जाण्यासाठी मदत करणार असल्याचे यासिनने फोनवरील संभाषणादरम्यान आपल्या पत्नीला सांगितल्याची माहिती दिल्ली पोलीसांच्या हाती लागली आहे. सिरीया हे इसिस या इस्लामी दहशतवादी संघटनेच्या कारवायांचे प्रमुख केंद्र असल्याने भारतीय सुरक्षा यंत्रणांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतली आहे. याशिवाय, तुरूंगात इतकी कडेकोट सुरक्षाव्यवस्था असताना यासिन भटकळला मोबाईल कसा मिळाला, या प्रश्नाने सुरक्षा यंत्रणांना पेचात टाकले आहे. साधारण एका महिन्यापूर्वी हा मोबाईल लपवून तुरूंगात आणला असून इतर कैदीही या मोबाईलचा वापर करत असल्याचेही चौकशीत उघड झाले आहे. हैदराबाद जेलमधून यासिननं पत्नीला जवळपास दहा फोन केलेत. यासिन भटकळवर २०१० सालच्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणात सहभागी असल्याचा आरोप आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 4, 2015 12:23 pm