धार (मध्य प्रदेश)/मुंबई : इंदूरहून अमळनेरकडे येणारी एसटी महामंडळाची बस सोमवारी नर्मदा नदीत कोसळल्याने १२ जणांचा मृत्यू झाला. नदीच्या पात्रातून आतापर्यंत १२ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यांची ओळख पटली असून मृतांमध्ये एसटीचा चालक आणि वाहकाचा समावेश आहे.

अमळनेर एसटी आगाराची ही बस सकाळी ७.३० वाजता इंदूर येथून सुटली होती. बस धार जिल्ह्यातील खलघाटनजीक नर्मदा नदीच्या पुलावर येताच चालकाचे नियंत्रण सुटले आणि संरक्षक कठडा तोडून ती २५ फूट खाली नदीपात्रात कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच धार जिल्हा प्रशासनाने मदत आणि बचाव कार्य सुरू केले. अपघात एवढा भीषण होता की बस नदीतल्या खडकाळ भागावर आपटून पाण्यात कलंडल्याने तिचा चक्काचूर झाला. बसचा सांगाडा बचाव पथकाने बाहेर काढला असून शोधमोहीमही सुरू आहे.

आतापर्यंत १२ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. हे सर्व मृतदेह धामणोत येथील ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. अजूनही बचावकार्य सुरू असल्याचे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले.

अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना एसटी महामंडळातर्फे प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तर पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीतून मृतांच्या नातलगांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

दरम्यान, बचाव कार्य आणि जखमींवर त्वरित उपचारासाठी मध्य प्रदेशातील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवण्याचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिला. तसेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी संवाद साधून अपघातग्रस्तांना आवश्यक ते सहकार्य करण्याची विनंतीही शिंदे यांनी केली.

दहा लाखांच्या मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा

अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले. तसेच मृतांच्या नातेवाईकांना एसटी महामंडळातर्फे प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदतही त्यांनी जाहीर केली.

पंतप्रधान मदतनिधीतून दोन लाख

या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. ‘‘पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातलगांना प्रत्येकी दोन लाख नुकसान रुपयांची भरपाई देण्यात येईल’’, अशी घोषणा पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट संदेशाद्वारे केली.

अपघातातील मृत

१. चंद्रकांत पाटील, (वय ४५, चालक), २. प्रकाश चौधरी (४०, वाहक), ३. अविनाश परदेशी (पाटणसराई, अमळनेर),

४. राजू तुलसीराम (३५)

५. जगन्नाथ जोशी (६८), ६. चेतन जागीड, ७. निंबाजी पाटील (६०, पिळोदा, अमळनेर),

८. सैफउद्दीन अब्बास अली बोहरा, ९. कल्पना पाटील (५७, बेटावद, धुळे), १०. विकास बेहरे (३३, विरदेल, धुळे),

११. आरवा मुर्तजा बोहरा (२७), १२. रुख्मणीबाई जोशी

अपघाताच्या चौकशीसाठी तीन सदस्य समिती

मुंबई : मध्य प्रदेशातील इंदूर येथून महाराष्ट्रात येणाऱ्या एसटी महामंडळाची बस सोमवारी नर्मदा नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला. या अपघाताची एसटी महामंडळाकडून चौकशीही होणार असून त्यासाठी तीन सदस्य समिती नेमण्यात आली आहे. दरम्यान, अपघातग्रस्त एसटीत नेमके किती प्रवासी होते याचा गोंधळ दिवसभर सुरु होता. अपघाताच्या दीड तास आधी वाहकाकडील ट्रायमॅक्स कंपनीचे इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीनला नेटवर्क नव्हते. त्यामुळे या दीड तासात एसटीतून प्रवास करणारे किती प्रवासी होते याचे गूढ वाढले होते. मात्र दहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून तेवढय़ाच प्रवाशांच्या नातेवाईकांनी संपर्क साधल्याचे रात्री उशिरा महामंडळाने स्पष्ट केले. या अपघातामुळे ट्रायमॅक्स मशीनला नेटवर्क नसणे, एसटी गाडय़ांचे आयुर्मान हे मुद्देही पुढे आले आहेत.

अमळनेर (जळगाव जिल्हा) आगाराची इंदोर- अमळनेर बस क्रमांक एम एच ४० एन ९८४८ ही सोमवारी सकाळी ७.३०च्या सुमारास इंदोर येथून अमळनेरच्या दिशेने मार्गस्थ झाली. त्यानंतर सकाळी ९.४७च्या सुमारास बस नर्मदा नदीत कोसळली. त्याआधी सकाळी ८ वाजून १० मिनिटाला  वाहकाने शेवटचे तिकीट काढल्याची नोंद एसटी महामंडळाकडे झाली आहे.

मशीनचे नेटवर्क गेल्यानंतरही अपघाताच्या आधी आणखी काही प्रवाशांनी एसटीत प्रवेश केला होता का ? याची चौकशीही दिवसभर सुरू होती. या अपघाताच्या चौकशीसाठी तीन सदस्य समिती नेमण्यात आली आहे, असे एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले. 

* २०१६ मध्ये पावसाळय़ात महाडमधील सावित्री पूल वाहून गेल्याची घटना घडली होती.

* यामध्ये दोन एसटीही दुर्घटनाग्रस्त झाल्या होत्या आणि २२ हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

* या घटनेतही अपघातग्रस्त बसमधील दोन्ही वाहकांकडे तिकीट काढण्यासाठी असलेल्या इलेक्ट्रॉनिक ट्रायमॅक्स मशीनचे अपघाताच्या दीड तास आधी नेटवर्क गेले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

* त्यामुळे बसमध्ये नेमके किती प्रवासी होते याचेही गूढ वाढले होते.