नवी दिल्ली, मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची खासदारांची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मान्य केल्यानंतरही पक्षाचे १२ खासदार सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले. शिंदे हे या खासदारांसह मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आह़े

विधान परिषद निवडणुकीच्या मतदानानंतर २० जूनला एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत मोठी फूट पाडली. एकापाठोपाठ एक असे शिवसेनेचे ४० आमदार शिंदे यांच्या गटात दाखल झाले. त्यानंतर भाजपबरोबर सत्ता स्थापन करून मुख्यमंत्रीपद मिळवल्यानंतर शिंदे यांनी पक्षसंघटनेत फूट पाडण्यासाठी पक्ष पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक यांना आपल्याकडे वळवण्यावर लक्ष केंद्रीत केले होते. त्यातच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना खासदारांमध्येही फूट पडली.

शिंदे गटाच्या बैठकीत जवळपास १२ खासदारांनी ऑनलाइन हजेरी लावल्याचे समजते. भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्वप्रथम जाहीर मागणी करणारे राहुल शेवाळे यांच्याकडे शिंदे गटातील खासदारांचे गट नेतेपद देण्यात येईल अशी चर्चा आहे. विनायक राऊत, अरिवद सावंत, गजानन कीर्तीकर, संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, राजन विचारे हे सहा खासदार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असल्याचे सांगण्यात आले.

शिवसेना खासदारांमध्ये फूट पडत असताना ‘मरेपर्यंत शिवसेना सोडणार नाही’ असा दावा करणारे शिवसेनेचे नेते व माजी मंत्री रामदास कदम यांनी सोमवारी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर सत्ता स्थापन करून बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केल्याचा आरोप कदम यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेतेपदी नियुक्ती केली होती. मात्र, शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेतेपदाला कुठलीही किंमत राहिली नाही हे मला पाहायला मिळाले, अशी टीकाही कदम यांनी केली.

रामदास कदम यांनी टीका करताच त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. याशिवाय ‘ईडी’च्या कारवाईची टांगती तलवार असलेले माजी खासदार आनंद अडसूळ हे शिंदे गटाबरोबर गेल्याने त्यांचीही शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. शिवसेनेत फूट पडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाची दक्षिण मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलात बैठक झाली. त्यात शिवसेनेची कशी कोंडी करता येईल, यावर उहापोह झाला. शिवसेनेचे आपणच नेते व त्यामुळे पक्षाचे चिन्ह मिळावे, असा अर्ज शिंदे गटाकडमून निवडणूक आयोगाकडे लवकरच केला जाणार आहे. शिंदे गटाची राष्ट्रीय कार्यकारिणी नेमल्याची चर्चा सुरू झाल्याबाबत पत्रकारांनी दीपक केसरकर यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी त्यास दुजोरा देण्यास नकार दिला.

शिवसेनेच्या बैठकीला फक्त ५ खासदार

शिवसेनेचे १२ बंडखोर खासदार शिंदे गटातील बैठकीत सहभागी झाल्याचे कळताच सोमवारी संध्याकाळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीतील निवासस्थानी शिवसेनेच्या खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते विनायक राऊत, अरिवद सावंत, संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, राजन विचारे आणि राज्यसभेतील खासदार अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी उपस्थित होत्या. लोकसभेतील खासदार गजाजन कीर्तीकर दिल्लीत आलेले नाहीत. त्यामुळे शिवसेनेचे लोकसभेतील पाच खासदारांनी बैठकीला हजेरी लावली. अन्य १२ खासदार गैरहजर राहिल्याने शिवसेनेमध्ये राष्ट्रीय स्तरावर फूट पडल्याचे स्पष्ट झाले.

सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी

खासदारांमध्ये फूट पाडून शिंदे गटाने शिवसेनेला दुसरा धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून, सरन्यायाधीश व्ही. एन. रमण यांच्या तीन सदस्यीय खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे शिवसेना, शिंदे गट आणि भाजपचेही लक्ष असेल.

लोकसभाध्यक्षांना शिवसेनेचे पत्र

शिवसेना खासदारांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे लोकसभेतील गटनेते विनायक राऊत हे सोमवारी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्यासाठी गेले होत़े  मात्र, त्यांची भेट होऊ शकली नाही़  त्यामुळे त्यांनी बिर्ला यांच्या कार्यालयाला एक पत्र दिल़े  शिवसेनेच्या प्रतोदपदी राजन विचारे यांची निवड करण्यात आली असून, याबाबत पक्षाला पूर्वसूचना न देता कोणताही निर्णय घेऊ नये, असे पत्रात म्हटले आह़े

लोकसभेत स्वतंत्र गट?

’शिंदे गटात सहभागी होणाऱ्या खासदारांच्या वेगळय़ा गटाला मान्यता दिली जावी, अशी विनंती करणारे पत्र मंगळवारी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना देण्यात येणार आहे.

’लोकसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी मंगळवारी सकाळी शिंदे गटातील खासदारांचे शिष्टमंडळ बिर्ला यांची भेट घेणार असल्याचे समजते.

’लोकसभाध्यक्षांनी शिंदे गटाला मान्यता दिली तर, त्यांची आसनव्यवस्थाही बदलण्यात येईल. त्यासंदर्भात तीन-चार दिवसांमध्ये निर्णय होऊ शकतो.

लोकसभाध्यक्षांना शिवसेनेचे पत्र

शिवसेना खासदारांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे लोकसभेतील गटनेते विनायक राऊत हे सोमवारी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्यासाठी गेले होत़े  मात्र, त्यांची भेट होऊ शकली नाही़  त्यामुळे त्यांनी बिर्ला यांच्या कार्यालयाला एक पत्र दिल़े  शिवसेनेच्या प्रतोदपदी राजन विचारे यांची निवड करण्यात आली असून, याबाबत पक्षाला पूर्वसूचना न देता कोणताही निर्णय घेऊ नये, असे पत्रात म्हटले आह़े

हा कॉमेडी एक्स्प्रेसभाग दोन – राऊत शिंदे गटाचा शिवसेनेमध्ये फूट पाडण्याचा सातत्याने केला जाणारा खेळ म्हणजे ‘कॉमेडी एक्स्प्रेस’चा भाग दोन असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली. या बंडखोर गटाला अजून मान्यता नाही तरी, शिंदे गट शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करत आहेत, हा प्रकार हास्यास्पद आहे. शिवसेना हा नोंदणीकृत पक्ष आहे, गट नव्हे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून अनेक फुटून बाहेर पडले आहेत. या फुटीरांना शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा अधिकार नाही, असे राऊत म्हणाले.