Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबाद एअर इंडिया विमान दुर्घटनेत विमानातील २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला तर विमान ज्याठिकाणी कोसळले तिथे २४ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी दुपारी लंडनला जाण्यासाठी एअर इंडियाच्या एआय-१७१ विमानाने उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या ३० सेकंदात विमान मेघानी नगर भागात कोसळले. बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहाला विमान आदळून त्याचा स्फोट झाला. यावेळी वसतीगृहाबाहेर चहाचे दुकान चालविणाऱ्या १३ वर्षीय आकाश पटनीचाही दुर्दैवी मृत्यू झाला. त्याची आई थोडक्यात बचावली.
विमानाचा पत्रा आकाशच्या डोक्याला लागला
गुरूवारी दुपारी १.३९ मिनिटांनी सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या ३० सेकंदात विमानाला अपघात झाला. बीजे मेडिकल वसतिगृहाच्या इमारतीला आदळल्यानंतर विमानाचे तुकडे येथील परिसरात फेकले गेले. याच ठिकाणी आकाश आणि त्याची आई चहाचे दुकान सांभाळत होती.
आकाश पटनीच्या नातेवाईकांनी एबीपी माझाशी संवाद साधताना अपघातावेळी काय घडले? याची माहिती दिली. आकाशच्या काकू म्हणाल्या, “अपघात झाला तेव्हा आकाश आणि त्याची आई चहाच्या स्टॉलजवळ होते. आकाश तेव्हा स्टॉलच्या बाजूला झोपला होता. विमानाचा एक पत्रा आकाशच्या डोक्याला लागल्यामुळे तो बेशुद्ध झाला. यातच आग लागली आणि आकाश त्यात भरडला गेला. आईने आकाशला वाचविण्याचा प्रयत्न केला, यात तीही भाजली गेली. शेवटी शक्य न झाल्यामुळे आईने आगीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.
आकाशच्या दुसऱ्या काकूने सांगितले की, विमानाचा पत्रा आकाशच्या डोक्याला लागल्यामुळे तो उठू शकला नाही. आकाशच्या आईलाही दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाचा आधारस्तंभ
आकाश पटनीचे वडील करोना महामारीदरम्यान मृत पावले होते. तेव्हापासून आकाश आईबरोबर चहाचा स्टॉल चालवत होता. यातूनच त्यांचा उदरनिर्वाह होत होता. मात्र विमान दुर्घटनेमुळे पटनी कुटुंबातील आधारस्तंभ हिरावला गेला.