India To Continue Buying Russian Oil: रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून भारत सातत्याने रशियाकडून तेल खरेदी करत आहे. या तेल खरेदीवर रशिया भारताला मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. अशात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनातील अधिकारी, भारत रशियन तेल खरेदी करून पुतिन यांच्या युक्रेनविरोधातील युद्धयंत्रणेला रसद पुरवत असल्याचा आरोप करत आहेत. याचबरोबर ट्रम्प यांनी रशियन तेलाची खरेदी केल्याबद्दल भारतावर एकूण ५० टक्के कर लादला आहे.

अशात भारताचे रशियातील राजदूत विनय कुमार यांनी म्हटले आहे की, भारतीय कंपन्यांना जिथे जिथे सवलतीच्या दरात तेल मिळेल तिथून तेल खरेदी करत राहतील. याचबरोबर भारत आपल्या “राष्ट्रीय हिताचे” रक्षण करणारे उपाय करत राहील.

रविवारी प्रकाशित झालेल्या रशियाच्या सरकारी टीएएसएस वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, कुमार म्हणाले की, भारताची प्राथमिकता देशातील १.४ अब्ज लोकांची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करणे आहे.

भारताने सवलतीच्या दरात रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीवर अमेरिकेने केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे वक्तव्य आले आहे, अमेरिकेची ही टीका भारताने जोरदारपणे फेटाळून लावली आहे.

व्यापार “व्यावसायिक आधारावर” होतो यावर भर देऊन, विनय कुमार म्हणाले की, “भारतीय कंपन्या जिथे जिथे सर्वोत्तम ‘डील’ मिळेल तिथून खरेदी करत राहतील. म्हणूनच सध्याची परिस्थिती अशी आहे.”

“आम्ही स्पष्टपणे सांगितले आहे की, आमचे उद्दिष्ट भारतातील १.४ अब्ज लोकांची ऊर्जा सुरक्षा आहे आणि इतर अनेक देशांप्रमाणेच रशियासोबत भारताच्या सहकार्यामुळे तेल बाजारपेठेत, जागतिक तेल बाजारपेठेत स्थिरता आणण्यास मदत झाली आहे”, असे विनय कुमार यांनी म्हटल्याचा उल्लेख रशियन वृत्तसंस्थेच्या वृत्तात आहे.

डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने भारतीय वस्तूंवरील टॅरिफ दुप्पट करून तब्बल ५० टक्के केले आहे, ज्यामध्ये भारताने रशियन कच्च्या तेलाच्या खरेदी केली म्हणून अतिरिक्त २५ टक्के टॅरिफचाही समावेश आहे, या पार्श्वभूमीवर भारताचे रशियातील राजदूत विनय कुमार यांनी तेल खरेदीबाबत टीप्पणी केली आहे.

अमेरिकेने आरोप केला आहे की, भारत रशियन कच्च्या तेलाची खरेदी करत असल्यामुळे रशियाला युक्रेनविरोधातील युद्धासाठी निधी मिळत आहे, हा आरोप भारताने जोरदारपणे फेटाळून लावला आहे. अमेरिकेच्या निर्णयाला “अयोग्य, अवास्तव आणि अन्याय्य” म्हणत कुमार म्हणाले की, भारत सरकार “देशाच्या राष्ट्रीय हिताचे रक्षण करणारे उपाय करत राहील”.