न्यूझीलंडच्या साऊथ आयलँड बेटावरील फेअरवेल स्प्लिट या किनाऱ्यावर ‘पायलट व्हेल’ या प्रजातीचे १९८ देवमासे भरकटले असून ते किनाऱ्यावर मरणासन्न अवस्थेत पडून आहेत. त्यांच्यापैकी १४० मासे मरण पावले आहेत.
या किनाऱ्यावरून विचित्र भौगोलिक रचना देवमाशांना नेहमीच संभ्रमात पाडते आणि ते आपल्या मार्गावरून भटकून तेथे अडकून पडतात. शुक्रवारी किनाऱ्यावर पडलेल्या १९८ माशांपैकी अनेक मासे मरण पावले असले तरीही त्यातील ६० माशांना अजूनही परत पाण्यात सोडून वाचवता येईल, अशी आशा पर्यावरण तज्ज्ञ आणि मदत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
इतक्या मोठय़ा प्रमाणात मासे भरकटण्याची अलीकडच्या काळातील ही पहिलीच घटना आहे. स्थानिक पर्यावरण विभागाचे व्यवस्थापक अँड्रय़ू लॅमसन यांनी या घटनेबद्दल आश्चर्य व्यक्त केले. त्यांच्या मते, देवमासे अत्यंत हुशार असतात. ते असे कसे भरकटले हे कळणे अवघड आहे. पायलट व्हेल या प्रजातीचे मासे आकाराने ६ मीटर (२० फूट) पर्यंत वाढू शकतात.