IFS Madhuri Gupta Case : मैत्री झाली, प्रेमात पडली अन्… ज्योती मल्होत्राआधी माधुरी गुप्ताने केली होती पाकिस्तानसाठी हेरगिरी; २०१० चं ‘ते’ प्रकरण तुम्हाला माहितेय का?ट्रॅव्हल विथ जो या लोकप्रिय युट्यूब चॅनेलचा चेहरा असलेल्या ज्योती मल्होत्राला हेरगिरीच्या आरोपीखाली अटक करण्यात आली आहे. भारतातील संवेदनशील माहिती पाकिस्तानबरोबर शेअर केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. तिची सध्या चौकशी सुरू असून तिच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेतय. या घटनेमुळे माधुरी गुप्ता प्रकरणाचीही चर्चा आता सुरू झाली आहे. या महिलेनेही गुप्तपणे पाकिस्तानबरोबर संबंध जोपासल्याचा आरोप होता. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.
कोण होती माधुरी गुप्ता?
या दोन्ही महिलांमधील फरक एवढाच आहे की माधुरी गुप्ता ही महिला फारशी प्रभावी किंवा प्रसिद्ध व्यक्तिमत्व नव्हती. ती सरकारी अधिकारी होती. इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयात द्वितीय सचिव (प्रेस आणि माहिती) या पदावर ती कार्यरत होती. पाकिस्तानी गुप्तचर अधिकारी जमशेदने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्या भावनांचा वापर करून तिला हनीट्रॅपमध्ये अडकवलं होतं.
मैत्री झाली अन्…
२०१० साली दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने माधुरी गुप्ताला पाकिस्तानच्या आयएसआय गुप्तहेर संस्थेला संरक्षणाशी संबंधित संवेदनशील माहिती पुरवल्याबद्दल अधिकृत गुप्तता कायद्यांतर्गत अटक केली. तपासात असं दिसून आलं की दोन पाकिस्तानी गुप्तहेर अधिकारी मुदस्सर रझा राणा आणि जमशेद यांनी तिच्याशी संपर्क साधला होता. या दोघांनी एका महिला पत्रकारामार्फत तिच्याशी संपर्क साधला आणि तिला जैश एस मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अझहर यांनी लिहिलेले पुस्तक मिळवण्यास मदत केली. इथूनच त्यांच्या मैत्रीची सुरुवात झाली.
त्याच्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारायलाही तयार
पुढे चौकशीत असं स्पष्ट झालं की ५२ वर्षीय माधुरी गुप्ता तिच्यापेक्षा अर्ध्या वयाच्या असलेल्या जमशेदशी ब्लॅकबेरी फोनच्या माध्यमातून संपर्कात होती. या दोघांमध्ये मैत्री एवढी वाढली की ती त्याच्या प्रेमात पडली अन् त्याच्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारायलाही तयार झाली. तिला जमशेदबरोबर लग्न करून इस्तंबूलला जायचं होतं. या दोघांमध्य कामासंदर्भात सुफी, रुमी आणि उर्दू भाषेतून संपर्क होत होता. या तिन्ही भाषेवर तिचं प्रभुत्व होतं.
भारत सरकारवर राग म्हणून…?
माधुरी गुप्ताचा दोन वर्षांचा सब्बॅटिकल ब्रेक मंजूर झाला नव्हता आणि तिचा पगारही रोखण्यात आला होता, त्यामुळे तिचा भारत सरकारवर राग होता, असंही पुढे चौकशीतून समोर आलं.
राणासाठी काश्मीर दौरा
दरम्यान, जमशेदचा सहकारी राणा हा पाकिस्तानचे तत्कालीन गृहमंत्री रहमान मलिक यांचा बॅचमेट होता. माधुरी गुप्ताने मार्च २०१० मध्ये राणाच्या सूचनेनुसार जम्मू आणि काश्मीरचा वार्षिक योजना अहवाल मिळवण्यासाठी दौरा केला होता. राणाला २०२० पर्यंत राज्यात उभारल्या जाणाऱ्या प्रस्तावित ३१० मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पाची माहिती हवी होती.
असा पकडला गुन्हा
अधिकारक्षेत्राबाहेरील बाबींमध्ये तिने रस दाखवायला सुरुवात केली तेव्हा इस्लामाबादमधील वरिष्ठांचं तिच्याकडे लक्ष वेधलं गेलं. त्यामुळे सार्क शिखर परिषदेच्या तयारीत गुप्ता यांच्या मदतीची आवश्यकता असल्याचं कारण देऊन तिला अचानक दिल्लीला बोलावण्यात आलं आणि तिची चौकशी करून तपासात तथ्य आढळल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
२०१८ मध्ये न्यायालयाने माधुरी गुप्ताला दोषी ठरवलं आणि नमूद केलं की आरोपींनी पाठवलेले इमेल हे स्पष्टपणे संवेदनशील माहिती होती, जी शत्रू देशासाठी उपयुक्त ठरू शकली असती. तिची शिक्षा भोगून झाल्यानंतरही माधुरी गुप्ता एकटीच राहिली. राजस्थानमधील भिवाडीमध्ये ती एकटी राहत होती. ऑक्टोबर २०२१ मध्ये वयाच्या ६४ व्या वर्षी तिचं निधन झालं.