डोवलेश्वरम येथे गोदावरी नदीवर असलेल्या पुलावरून एसयूव्ही वाहन कोसळून सात मुलांसह २२ जण ठार झाले. तिरुपती येथे भेट देऊन हे भाविक एसयूव्ही (स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल) मधून परत येत असताना हा अपघात झाला असे पोलिसांनी सांगितले. सर्व प्रवासी हे विशाखापट्टणम जवळच्या अच्युतापुरमचे होते.
एक मुलगा या अपघातात वाचला असून तो जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, वाहनाने पुलाच्या कठडय़ाला धडक दिली व तो तोडून ते नदीत कोसळले, असे पूर्व गोदावरीचे जिल्हाधिकारी अरुण कुमार यांनी सांगितले.
मृतांमध्ये सात मुले, आठ महिला व सात पुरुषांचा समावेश आहे, गाडीचा चालक व मालकही यात ठार झाला. पहाटेच्या वेळी हा अपघात झाला व पोलिसांना सकाळी पाच वाजता ही घटना समजली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिथे अपघात झाला ते धोक्याचे ठिकाण नव्हते, केवळ निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला आहे. मृतांचे शवविच्छेदन करून ते नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे कुमार यांनी सांगितले आहे.