Chandrayaan 3 : चांद्रयान ३ मोहिमेच्या यशस्वीतेनंतर भारतभर आनंद व्यक्त केला जातोय. या मोहिमेमुळे अनेकांच्या मनात अंतराळाविषयी उत्सुकता निर्माण झालीय. शालेय विद्यार्थ्यांनाही या यशामुळे प्रेरणा मिळाली आहे. चांद्रयान ३ मोहिमेमुळे आता अनेक मुलं खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यास उत्सुक आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. २३ ऑगस्ट रोजी चांद्रयान ३ मोहीम यशस्वी झाली होती. त्या दिनाला खास बनवण्याचा निर्णय मोदींनी घेतला आहे. आज इस्रोच्या वैज्ञानिकांशी संवाद साधताना त्यांनी ही घोषणा केली आहे.

हेही वाचा >> पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, चांद्रयान ३ उतरलं त्या जागेचं नामकरण; आता ‘या’ नावाने ओळखला जाणार लँडिंग स्पॉट!

“भारताची युवा पिढी तंत्रज्ञान, विज्ञानाने भारलेली आहे. त्यामागे आपल्या अशाच स्पेस मिशनचं यश आहे. मंगलायानचे यश, चांद्रयान मोहिमेचे यश, गगनयानामुळे देशाच्या युवा पिढीला नवा उत्साह मिळाला आहे. प्रत्येकाच्या तोंडी आज चांद्रयानाचे नाव आहे. भारतातील प्रत्येक लहान मूल वैज्ञानिकांमध्ये आपलं भविष्य पाहत आहे. त्यामुळे तुम्ही (वैज्ञानिकांनी) फक्त चंद्रावर तिरंगा फडकवला नसून तुम्ही एक मोठं यश प्राप्त केलं आहे, ज्यामुळे भारताची संपूर्ण पिढी जागृत झाली आहे, त्यांना नवी ऊर्जा मिळाली आहे. तुम्ही पूर्ण पिढीवर आपल्या यशाचा ठसा उमटवला आहे”, असं मोदी म्हणाले. “आज तुम्ही भारतीय मुलांमध्ये आकांक्षाचे बिज रोवले आहे, ते उद्या वटवृक्ष बनणार आहे”, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आपल्या युवा पिढीला निरंतर प्रेरणा मिळावी याकरता एक आणखी निर्णय घेतला आहे, की २३ ऑगस्टला जेव्हा भारताने चंद्रावर तिरंगा फडकवला त्या दिनाला भारतात राष्ट्रीय अंतराळ दिवस (National Space Day) रुपाने साजरा केला जाणार आहे, अशी घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.