मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये नोंदणी नसलेल्या अनधिकृत बालिका गृहातून २६ मुली बेपत्ता झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या मुली गुजरात, झारखंड, राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील सीहोर, रायसेन, छिंदवाडा, बालाघाट या जिल्ह्यातील राहणाऱ्या होत्या. विनापरवाना बालिका गृह चालविल्याबद्दल आता पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. राष्ट्रीय बाल आयोगाचे अध्यक्ष प्रियंक कानूनगो यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून राज्याचे मुख्य सचिव वीरा राणा यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली.

प्रियंक कानूनगो यांनी काही दिवसांपूर्वी या बालिका गृहाला अचानक भेट दिली, तेव्हा हा प्रकार समोर आला. भोपाळमधील आंचल गर्ल्स हॉस्टेल हे परवालिया परिसरात येते. भोपाळ शहराच्या बाहेरील बाजूस हा परिसर आहे. कानूनगो यांनी जेव्हा बालिका गृहाची नोंदवही तपासली तेव्हा त्यात ६८ मुलींची नोंदणी आढळली. मात्र तपासणी केल्यानंतर त्यापैकी २६ मुली बेपत्ता असल्याचे आढळले. या गर्ल्स हॉस्टेलचे संचालक अनिल मॅथ्यू यांना याबाबत जेव्हा विचारणा केली, तेव्हा त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

एफआयआरमधील तक्रारीनुसार, सदर ठिकाणी अनेक गैरप्रकार होत असल्याचे आढळून आले आहेत. कानूनगो यांनी एक्स या सोशल मीडिया साईटवर यासंबंधी एक सविस्तर पोस्ट टाकली. ते म्हणाले, “मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे राज्य बाल आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांसह एका अनधिकृत बालगृहाची पाहणी केली. रस्त्यावरील मुलांना उचलून त्यांना या बालिका गृहात टाकले गेले होते, याची कोणतीही माहिती सरकारला दिलेली नाही. इथे मुलांवर ख्रिश्चन धर्माचे संस्कार केले जात आहेत. या बालिका गृहात ६ वर्षांपासून ते १८ वर्षांपर्यंतच्या जवळपास ४० हून अधिक मुली हिंदू आहेत.”

माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह म्हणाले..

हे प्रकरण उजेडात आल्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, भोपाळच्या परवलिया पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात एक अनधिकृत बालिका गृह चालविले जात असून तिथून २६ मुली बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाची गंभीरता आणि संवेदनशीलता पाहता सरकारने त्वरीत कारवाई करावी, अशी माझी मागणी आहे.