कॉर्पोरेट लॉबिस्ट नीरा राडिया टाटा कंपनीसाठी दूरसंचार आणि अन्य विभागांसमवेत लॉबिंग करीत होत्या का, याची आपल्याला कल्पना नाही, असे टूजी स्पेक्ट्रम प्रकरणाची चौकशी करणाऱ्या मुख्य तपास अधिकाऱ्याने मंगळवारी दिल्ली न्यायालयात स्पष्ट केले.
टूजी प्रकरणाचा तपास करीत असताना प्राप्तिकर विभागाकडून आपल्याला राडिया यांच्या दूरध्वनी संभाषणाची ध्वनिफीत मिळाली, असे सीबीआयचे पोलीस अधीक्षक विवेक प्रियदर्शी यांनी न्यायालयास सांगितले. त्यापूर्वी राडिया यांची सरकारी पक्षाच्या साक्षीदार म्हणून टूजी प्रकरणात जबानी नोंदविण्यात आली होती. राडिया यांनी टाटा कंपनीसाठी दूरसंचार आणि अन्य विभागांशी लॉबिंग करून त्यांच्या पदाचा गैरफायदा घेतला का, त्याची आपल्याला कल्पना नाही, असे प्रियदर्शी यांनी सांगितले. प्राप्तिकर विभागाकडून आपल्याला या संभाषणाची सीलबंद हार्डडिस्क मिळाली, असेही ते म्हणाले.