गेल्या वर्षीपासून आतापर्यंत उत्तर सिक्कीममध्ये जोरदार हिमवृष्टीमुळे सुमारे ३०० याक प्राण्यांचा मृत्यू झाला आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले. उत्तर सिक्कीमचे जिल्हा दंडाधिकारी राज यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार तीनशे याक प्राणी हे उपासमारीने मरण पावले.
डिसेंबर २०१८ पासून मुकुथांग व युमथांग भागात मोठय़ा प्रमाणावर हिमवृष्टी झाली असून आतापर्यंत मुकुथांग भागात याकचे २५० सांगाडे सापडले आहेत तर युमथांग भागात ५० सांगाडे सापडले आहेत.
गेल्या वर्षीच्या डिसेंबरपासून हिमवृष्टीमुळे या प्राण्यांना काहीच खायला मिळाले नाही, त्याचा हा परिणाम असावा. पशुसंवर्धन विभागाने वैद्यकीय पथक मुकुथांग येथे पाठवले असून जे याक जिवंत आहेत, त्यांच्यासाठी अन्न व चारा पाठवण्यात आला आहे. याकची वैद्यकीय तपासणीही केली जाणार आहे. मुकुथांगमधील १५ व युमथांगमधील १० कुटुंबांच्या मालकीचे हे याक आहेत. या घटनेत फटका बसलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात येणार असून इंडो-तिबेट सीमा पोलिस व जिल्हा प्रशासन अहवाल तयार करीत आहे.