जद(यू)च्या चार आमदारांना अपात्र ठरविण्याचा निर्णय पाटणा उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविल्याने अन्य चार अपात्र आमदारांचे नीतिधैर्य उंचावले असून त्यांनीही बिहार विधानसभा अध्यक्षांच्या आदेशाला आव्हान देण्याची तयारी केली आहे.
अजितकुमार (कांटी), राजूकुमार सिंह (साहेबगंज), सुरेश चंचल (साकरा) आणि पूनम देवी (दिघा) अशी अन्य चार अपात्र आमदारांची नावे आहेत. पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप ठेवून पक्षांतरबंदी कायद्यानुसार या चौघांना विधानसभा अध्यक्ष उदय नारायण चौधरी यांनी अपात्र घोषित केले होते.
राज्यसभेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत पक्षादेश झुगारून अन्य उमेदवारांना मतदान केल्याचा ठपका सर्व आठ आमदारांवर होता. त्यापैकी चार आमदारांना अपात्र ठरविण्याचा निर्णय पाटणा उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविला. आम्ही पक्षविरोधी कारवाया केल्या नाहीत, केवळ नितीशकुमार यांनी घेतलेल्या निर्णयांना विरोध केला, असे पूनम देवी म्हणाल्या.