कॅनडामधील टोरांटो येथे झालेल्या भीषण कार अपघातामध्ये पाच भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. एक व्हॅन आणि ट्रॅक्टर ट्रेलरची धडक झाली, त्यातच हे पाच भारतीय विद्यार्थी मरण पावले असं भारतीय दुतावासाने स्पष्ट केलंय. या अपघातामध्ये अन्य दोन प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

भारताचे कॅनडामधील राजदूत अजय बिसारीया यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिलीय. “कॅनडामधील हृदयद्रावक घटना : शनिवारी टोरंटोजवळ झालेल्या अपघातात पाच भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. इतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांप्रती आम्ही सद्भावना व्यक्त करतो. भारतीय अधिकारी मरण पावलेल्या व्यक्तींच्या मित्रांच्या संपर्कात असून त्यांना मदत करत आहेत,” असं अजय बिसारीयांनी ट्विटमध्ये म्हटलंय.

देशाचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनीही ट्विटरवरुन या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करतानाच भारतीय दुतावासाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य या मृतांच्या जवळच्या व्यक्तींना केलं जाईल असं म्हटलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हरप्रीत सिंग (२४), जसपींदर सिंग (२१), करणपाल सिंग (२२), मोहित चौहान (२३) आणि पवन कुमार (२३) या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्वजन माँटेरिअल आणि ग्रेटर टोरांटो परिसरामधील शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेत होते.