इस्लामाबाद, पेशावर : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानदरम्यान संघर्ष सुरू असून पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या १९ लष्करी चौक्या आणि ‘दहशतवाद्यांचे तळ’ ताब्यात घेतले आहेत. अफगाणिस्तानमधून पाकिस्तानवर करण्यात येत असलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने ही कृती केली आहे.

अफगाणिस्तानने हल्ल्यांमध्ये ५८ पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून, ३० जण जखमी झाल्याचा दावा केला आहे. तालिबान सरकारने या हल्ल्यांना पुष्टी दिली आहे. दरम्यान, ‘‘अफगाणिस्तानला पाकिस्तानबरोबर सुरू असलेल्या सध्याच्या संघर्षात शांततापूर्ण तोडगा हवा आहे. पण, तो निघाला नाही, तर इतर पर्याय खुले आहेत,’’ असा इशारा अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमीर खान मुत्ताकी यांनी रविवारी नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत दिला. ‘‘अफगाणिस्तान एकीने परकीय आक्रमणाचा सामना करील,’’ असे ते म्हणाले.