नवी दिल्ली : देशाचे लक्ष वेधलेल्या राजधानी दिल्लीतील लोकसभेच्या सात जागांसाठी शनिवारी संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत केंद्रीय नवडणूक आयोगाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार ५४.४८ टक्के मतदान झाले. २०१९ च्या तुलनेत मतांची सुमारे ६ टक्के घसरण झाली. पाच वर्षांपूर्वी दिल्लीत सरासरी ६०.६० टक्के मतदान झाले होते.

दिल्लीसह उत्तरेमध्ये आठवडाभर तापमानाचा पारा ४५ अंशांच्या पलिकडे गेला आहे. उन्हाचा तडाखा टाळण्यासाठी दिल्लीकरांनी सकाळी सात वाजल्यापासून मतदार केंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या. उष्णतेची लाट असली तरी मतदान करण्यासाठी मतदारांनी घराबाहेर पडण्याचे आवाहन आप व भाजपचे नेते करत होते. ओखला आदी काही मुस्लिमबहुल भागांमध्ये तळपत्या उन्हातही मतदानासाठी रांगा लागल्याचे पाहायला मिळाले.

मतदानाच्या पहिल्या काही तासांमध्ये मतदानयंत्रांतील त्रुटींमुळे धिम्यागतीने मतदान झाले असले तरी त्यानंतर मतदानाने वेग घेतल्याचे उत्तर-पूर्व मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार कन्हैय्या कुमार यांनी सांगितले. उत्तर-पश्चिम मतदारसंघातील मतदान केंद्रामध्ये काँग्रेसच्या निवडणूक प्रतिनिधीला प्रवेश न दिल्याची तक्रार पक्षाचे उमेदवार उदित राज यांनी केली.

हेही वाचा >>>आवाज बदलण्याच्या ॲपचा वापर करून शिष्यवृत्तीचे आमिष आणि ७ विद्यार्थीनींवर बलात्कार; मजूर आरोपी ‘असा’ पकडला गेला

‘आप’चा अनियमततेचा आरोप

दिल्ली सरकारमधील मंत्री व ‘आप’च्या नेत्या आतिशी यांनी मतदानादरम्यान मतदान केंद्रांवर अनियमितता झाल्याचा आरोप केला. ‘एक्स’ या समाजमाध्यम व्यासपीठावरून त्यांनी काही मतदानकेंद्र असलेल्या शाळांची नावे घेतली. या केंद्रावर निवडणूक प्रतिनिधींकडून १७-क अर्जावर मतदान सुरू झाल्यानंतर सकाळीच स्वाक्षरी घेतल्या गेल्याचा दावा केला.

सेंट थॉमस शाळेतील मतदान केंद्रामधील मतदानयंत्रातील बॅटरी पूर्णक्षमतेने काम करत नसल्याचा अनुभवास आले आहे. यासंदर्भात आयोगाकडे लेखी तक्रार केली असल्याचे ‘माकप’च्या नेत्या वृंदा कारात यांनी सांगितले. माकप, काँग्रेस व आप नेत्यांच्या काही तक्रारी वगळता सर्व मतदारसंघांमध्ये मतदान शांततेत पार पडले.

हेही वाचा >>>गुजरातच्या राजकोटमधील गेमिंग झोनमध्ये भीषण आग; १६ जणांचा मृत्यू

प्रथम मतदानाची प्रशस्ती

केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अब्दुल कमाल मार्गावरील मतदान केंद्रावर सर्वात आधी मतदान केले. त्यांना सर्वप्रथम मतदान केल्याचे प्रशस्तिपत्रकही देण्यात आले. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी, नवी दिल्लीतील भाजपच्या उमेदवार बांसुरी स्वराज ल्युटन्स दिल्लीतील मतदानकेंद्रांत मतदान केले. भाजपचे दिल्ली अध्यक्ष विरेंद्र सचदेवा यांनी पूर्व दिल्लीतील मयुर विहारमध्ये मतदान केले.

मतदारांसाठी नारळ पाणी, उसाचा रस

● लोकसभा निवडणुकीच्या यापूर्वीच्या टप्प्यांमध्ये मतदारांना उन्हाचा त्रास सहन करावा लागला होता. सहाव्या टप्प्यात उन्हाच्या काहिलीने मतदार त्रस्त होऊ नये यासाठी अनेक मतदान केंद्रांमध्ये व्यवस्था करण्यात आली होती. दिल्लीमध्ये अनेक मतदान केंद्रांमध्ये नारळ पाणी, उसाचा रस आदी व्यवस्था करण्यात आली होती.

● मतदानाच्या दिवशी दिल्लीमध्ये ऑरेंज अॅलर्ट जारी केला होता. शनिवारी कमाल तापमान ४३.४ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. कडाक्याच्या उन्हातही अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. काही मतदार रणरणत्या उन्हामुळे मूर्च्छित झाले. उष्णतेवर मात करण्यासाठी मतदान अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रांवर पुरेसी व्यवस्था केली होती.

● दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या निवडणूक कार्यालयाने मतदान केंद्रांवर पाण्याचे पंखे, पाण्याने भरलेल्या मातीच्या घागरी, प्रशस्त प्रतीक्षा सभागृह, कूलरसह सावलीची जागा अशी व्यवस्था केली. काही मतदान केंद्रांवर मतदारांना नारळ पाणी वाटण्यात आले, तर काही मतदान केंद्रांवर उसाच्या रसाची व्यवस्था करण्यात आली होती.

मतांचा टक्का (संध्या. साडेसात वाजता)

चांदनी चौक- ५३.६०

पूर्व दिल्ली- ५४.३७

नवी दिल्ली- ५१.५४

ईशान्य दिल्ली- ५८.३०

वायव्य दिल्ली- ५३.८१

दक्षिण दिल्ली- ५२.८३

पश्चिम दिल्ली- ५४.९०