नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. यामध्ये एकूण १३२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रीय भूकंप मापन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमधील जाजरकोट जिल्ह्याच्या लामिडांडा परिसरात होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जाजरकोटमधील स्थानिक अधिकाऱ्याने ‘रॉयटर्स’ वृत्तसंस्थेला सांगितलं की, जिल्ह्यात किमान ९५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर शेजारच्या रुकुम पश्चिम जिल्ह्यात किमान ३७ लोक मृत पावल्याची माहिती समजत आहे. या दुर्घटनेनंतर देशातील तिन्ही सुरक्षा यंत्रणा जखमींना तत्काळ मदत करण्यासाठी घटनास्थळी रवाना झाल्या आहेत, याबाबतची माहिती नेपाळच्या पंतप्रधान कार्यालयातून देण्यात आली आहे.

नेपाळच्या गृहमंत्रालयाने सांगितलं की, दैलेख, सल्याण आणि रोल्पा जिल्ह्यांसह इतरही काही जिल्ह्यांतून लोक जखमी झाल्याची आणि मालमत्तेचं मोठं नुकसान झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. जखमींवर जाजरकोट जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जाजरकोट हे काठमांडूपासून पश्चिमेला सुमारे ५०० किलोमीटर अंतरावर आहे.

विशेष म्हणजे गेल्या महिन्यात ३ ऑक्टोबर रोजी, नेपाळमध्ये ६.२ रिश्टर स्केलच्या तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले होते. भारताची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील काही भागांमध्येही भूकंपाचे धक्के बसले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 6 point 4 magnitude earthquake in nepals jajarkot district atleast 70 died rmm
First published on: 04-11-2023 at 07:54 IST