Citizenship under CAA: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या टर्ममध्ये नागरिकत्व (दुरूस्ती) कायदा (CAA), २०१९ मंजूर करण्यात आला होता. भारताच्या शेजारी असलेल्या राष्ट्रांमधील भारतीय वंशाच्या नागरिकांना पुन्हा भारताचे नागरिकत्व मिळावे, यासाठी हा कायदा करण्यात आल्याचे सांगितले गेले. या कायद्यानुसार मुळचे गोव्यातील ७८ वर्षीय ख्रिश्चन धर्मीय जोसेफ परेरा यांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले आहे. परेरा हे २०१३ पासून गोव्यात राहत आहेत. त्याआधी पोर्तुगीजांकडून गोवा मुक्त होण्याआधी ते कुटुंबासह पाकिस्तानात स्थलांतरीत झाले होते. सीएए कायद्यानुसार नागरिकत्व मिळवलेले जोसेफ परेरा गोव्यातील पहिली व्यक्ती ठरले आहेत.

मरण्याच्या आधी नागरिकत्व मिळाले

१९४६ साली जन्मलेले जोसेफ परेरा हे मुळचे गोवन आहेत. पोर्तुगीजांची राजवट असताना ते कुटुंबियासह पाकिस्तानात स्थलांतरीत झाले. तिथेच नोकरी मिळाल्यानंतर त्यांनी पाकिस्तानमध्ये वास्तव्य केले. ११ सप्टेंबर २०१३ रोजी ते पुन्हा भारतात परतले. परेरा सध्या दक्षिण गोव्यात कुटुंबासह राहतात.

हे वाचा >> सीएए वादाच्या केंद्रस्थानी का असतं? कोणती आहेत कायदेशीर आव्हाने?

मी मरण्याच्या आधी मला नागरिकत्व मिळाले, याचा आंत्यतिक आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया परेरा यांनी माध्यमांशी बोलताना दिली. ते पुढे म्हणाले, नागरिकत्व मिळावे यासाठी मी देवाकडे प्रार्थना करत होतो. रोज याच विचारात दिवस काढत होतो. आता मला नागरिकत्व मिळाल्यानंतर आनंद वाटतोय. मी गोव्यातच जन्मलो, माझे पालक इथेच राहत होते, माझी पत्नीही गोव्याची आहे. मला कळत नाही, नागरिकत्व मिळण्यासाठी मला इतक्या वर्षांची वाट का पाहावी लागली. पण उशीरा का होईना अखेर नागरिकत्व मिळाले. आता मी भारतात कुठेही फिरू शकतो. यासाठी मला एफआरआरओच्या (Foreigners Regional Registration Office) परवानगीची गरज नाही.

परेरा पुढे म्हणाले, मी ११ वर्षांपूर्वी नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज केला होता. मी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो की त्यांनी सीएए सारखा कायदा आणला. सरकारी अधिकाऱ्यांनी या कायद्यानंतर माझ्या अर्जावर तातडीने कार्यवाही केली, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. ११ वर्षांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. नाहीतर दर दोन वर्षांनी मला एफआरआरओकडे व्हिसासाठी अर्ज करावा लागत होता.

हे ही वाचा >> CAA मुळे किती लोकांना नागरिकत्व मिळणार? आकडेवारी काय सांगते

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी (दि. २८ ऑगस्ट) सांगितले की, जोसेफ परेरा यांना सीएए कायद्यानुसार भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र देताना मला आनंद वाटला. जे कुणी नागरिकत्वासाठी पात्र असतील त्यांनी सरकारी विभागाशी संपर्क साधावा, असेही सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.