सुवर्णमंदिरात १९८४ मध्ये शीख अतिरेक्यांविरोधातील ऑपरेशन ब्लू स्टार कारवाई करण्यात आली होती़ त्यात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांनी गुप्तपणे मदत केली होती, असा गौप्यस्फोट मजूर पक्षाचे खासदार टॉम वॉटसन व लॉर्ड इंद्रजित सिंग यांनी केला असून, ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनीही थॅचर यांचा ऑपरेशन ब्लू स्टारशी काय संबंध होता याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
अलीकडेच मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे या दोघांनी असे म्हटले होते की, ब्रिटनच्या विशेष हवाई दल अधिकाऱ्यांना भारतास मदत करण्यासाठी पाठवण्यात आले होते व त्या वेळी सुवर्णमंदिरातील अतिरेकी विरोधी कारवाईत भिंद्रनवाले याच्यासह १००० जण मारले गेले होते.
ब्रिटनच्या सरकारी प्रवक्तयाने सांगितले की, त्या कारवाईत मोठय़ा प्रमाणात प्राणहानी झाली होती व कायदेशीर कागदपत्रांच्या आधारे देण्यात आलेल्या माहितीची चौकशी करण्याचे आदेश कॅमेरून मंत्रिमंडळ सचिवांना दिले आहेत.
विशेष म्हणजे या कागदपत्रांच्या प्रसिद्धीपूर्वी त्याची पंतप्रधान व परराष्ट्र सचिव यांना कल्पना नव्हती. सदरची कागदपत्रे ही तीस वर्षांपूर्वीची असून ती लंडनच्या राष्ट्रीय संग्रहालयाने प्रसृत केली. त्यात एक पत्र असून त्यावर गुप्त पत्र व व्यक्तिगत असा शेरा मारलेला असून ते २३ फेब्रुवारी १९८४ रोजी लिहिलेले आहे. अमृतसरमध्ये सुवर्णमंदिरात करण्यात आलेल्या कारवाईच्या चार महिने अगोदर ते लिहिण्यात आले होते. या पत्राचे शीर्षक ‘शीख समुदाय’ असे असून त्यात म्हटले आहे की, शीख अतिरेक्यांना सुवर्णमंदिरातून बाहेर काढण्यासाठीच्या योजनेत ब्रिटनने भारताला सल्ला द्यावा. त्या वेळी ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी त्याला अनुकूल प्रतिसाद दिला व त्याला पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांची परवानगी होती. खास हवाई दलाचा एक ब्रिटिश अधिकारी त्यानुसार भारतात आला व त्याने सुवर्णमंदिरातील कारवाईची योजना आखून दिली व ती त्यावेळच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी मंजूर केली. भारत सरकार लगेच ही योजना अमलात आणेल असे ब्रिटनच्या तत्कालीन परराष्ट्र मंत्र्यांना वाटले होते, पण इंदिरा गांधींनी ही मोहीम उशिरा राबवली़
संग्रहित लेख, दिनांक 15th Jan 2014 रोजी प्रकाशित
‘ऑपरेशन ब्लू स्टार’च्या आखणीत ब्रिटनची भारताला मदत?
सुवर्णमंदिरात १९८४ मध्ये शीख अतिरेक्यांविरोधातील ऑपरेशन ब्लू स्टार कारवाई करण्यात आली होती़ त्यात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांनी गुप्तपणे मदत केली होती,

First published on: 15-01-2014 at 12:53 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 84 secret india sought uk help in army action at golden temple