या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मृतांची संख्या २१; केरळमध्ये पहिला बळी

करोना विषाणूची लागण झालेल्या देशभरातील रुग्णांची संख्या शनिवारी ९३३ झाली. आतापर्यंत यापैकी २१ जणांचा मृत्यू ओढवला आहे. केरळमध्ये या विषाणूचा पहिला बळी शनिवारी नोंदविला गेला. गुजरातेत करोनामुळे एका महिलेचा शनिवारी मृत्यू झाला असून गुजरातमधील बळींची संख्या चार झाली आहे.

भारतात शनिवापर्यंत करोनाच्या ९३३ रुग्णांची नोंद झाल्याचे केंद्रीय आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. यापैकी ८३३ रुग्णांवर सध्या विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत, तर ७९ रुग्ण हे पूर्णत: बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. देशभरातील करोना बळींची संख्या आता २१ झाली आहे.

केरळमध्ये एर्नाकुलम मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात कोविद १९ विषाणूचा पहिला बळी गेला . हा रुग्ण एर्नाकुलमचा होता व त्याला २२ मार्च रोजी विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. तो दुबईहून परत आल्यानंतर त्याला वेगळे ठेवण्यात आले होते. न्यूमोनियाची लक्षणे दिसल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण नंतर त्याची करोना चाचणी सकारात्मक आली होती. त्याला हृदयरोग व उच्च रक्तदाबाचा विकारही होता. त्याच्यावर बायपास शस्त्रक्रिया झाली होती. स् कसरगोड येथे दहावीच्या परीक्षेस या महिन्यात उपस्थित राहिलेली मुलगी व तिच्या वडिलांना करोनाची लागण झाली आहे. तिचे वडील १७ मार्चला परदेशातून आले होते व त्यांची चाचणी सकारात्मक आली होती. केरळमधील रुग्णांची संख्या आता १६४ झाली आहे.

गुजरातेत करोनामुळे एका महिलेचा शनिवारी मृत्यू झाला असून गुजरातमधील बळींची संख्या चार झाली आहे. या महिलेचा सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात मृत्यू झाला. तिला अतिरक्तदाब व मधुमेह होता. गुजरातमध्ये करोनाचे सहा नवीन रुग्ण १२ तासांत सापडले असून एकूण रुग्णांची संख्या आता ५३ झाली आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

राजस्थानात चार नवीन रुग्ण

राजस्थानात शनिवारी करोनाचे आणखी चार रुग्ण सापडले असून एकूण संख्या आता ५४ झाली आहे. या चार जणांमध्ये भिलवाडा येथील एका खासगी रुग्णालयातील चार जणांचा समावेश आहे. या रुग्णालयातील काही डॉक्टर्स व परिचारिका यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे आधीच निष्पन्न झाले आहे.

तमिळनाडूत आणखी दोघांना लागण

तामिळनाडूमध्ये आणखी दोघांना करोनाची लागण झाल्याने राज्यात करोनाची लागण झालेल्यांची संख्या ४० वर पोहोचली आहे, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. ज्या दोघांना करोनाची लागण झाली, यापैकी एक जण वेस्ट इंडिजमधून तर दुसरा ब्रिटनमधून आला आहे.  ते मध्य पूर्वेकडील मार्गाने आले.

तमिळनाडूची केंद्राकडे ९ हजार कोटींची मागणी

करोनाचा मुकाबला करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदीचा आर्थिक परिणाम गंभीर होणार आहे त्यामुळे करोनाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारने नऊ हजार कोटी रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी शनिवारी केंद्र सरकारकडे केली. तमिळनाडूसह अनेक राज्यांनी मदत पॅकेज जाहीर केली आहेत आणि त्याला पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची साथ मिळत आहे, मात्र येणाऱ्या दिवसांमध्ये आणखी मदतीची गरज लागणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

जगभरात  २८,८०२ बळी

करोना विषाणूने जगभरात आतापर्यंत २८,८०२ बळी घेतले असून एकूण बाधित रुग्णांची संख्या  ६,१७,०८४ आहे. अमेरिकेत १,०४८,३७ रुग्ण असून   १७३० जणांचा मृत्यू ओढवला आहे. इटलीत मृतांची संख्या आता ९१३४ झाली असून रुग्णांची संख्या ८६,४९८ आहे. चीनमध्ये ३२९५ बळी गेले असून रुग्णांची संख्या ८१,३९४ आहे.

युरोपमध्ये करोनाने  जास्त बळी गेले असून स्पेनमध्ये २४ तासात ८३२ जण मरण पावले. त्यामुळे मृतांची संख्या ५६९० झाली, तर इटलीत एका दिवसात शुक्रवारी ९६९ बळी गेले आहेत. इराणमध्ये आणखी १३९ जणांचा मृत्यू झाला. तेथे २५१७ बळी गेले आहेत. दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग पोलिसांनी सामाजिक अंतराचा निकष न पाळणाऱ्या लोकांवर रबरी गोळ्या झाडल्या.  हे लोक सुपर मार्केटमध्ये खरेदीसाठी गर्दी करत होते. अमेरिकेत १७११ बळी गेले असून १,०४,०००रुग्ण आहेत. न्यूयॉर्कमध्ये आता  तरुणांचे बळी जाण्यास सुरुवात झाली आहे. करोनाने तरुणांना कमी धोका असल्याचे सांगितले जात असताना आता हा नवा कल दिसत आहे.

भारताला अमेरिकेची मदत

अमेरिकेने करोनाग्रस्त ६४ देशांना १७४ दशलक्ष डॉलर्सची (१३०० कोटी रूपये)  मदत शुक्रवारी जाहीर केली असून त्यात भारताला २९ लाख डॉलर्स (२१.७ कोटी रूपये) देण्यात आले आहेत. फेब्रुवारीत अमेरिकेने १०० दशलक्ष डॉलर्सची मदत जाहीर केली होती. त्या व्यतिरिक्तची ही मदत आहे. ही मदत जागतिक प्रतिसाद योजनेतील आहे.

२ लाख कोटी डॉलर्सच्या मदत योजनेवर ट्रम्प यांची स्वाक्षरी

करोनामुळे अमेरिकेत आर्थिक आपत्तींचा सामना करणाऱ्या लोकांसाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २ लाख कोटी डॉलर्सच्या योजनेवर स्वाक्षरी केली आहे. या ऐतिहासिक मदत योजनेचा लाभ लाखो लोकांना होणार आहे

इटलीत संसर्गाचा वेग मंदावला; पण स्थिती भीषणच

जगात चीनपेक्षाही जास्त बळी इटलीमध्ये गेले असून तेथे करोना विषाणूने थैमान घातले आहे. इटलीमध्ये अजून करोनाच्या साथीची परमोच्च अवस्था अजून काही दिवस दूर आहे. त्यावेळी इटलीबरोबरच जगातील करोना बळींची संख्या आणखी वाढणार आहे.

युरोपात तीन लाख लोकांना संसर्ग झाला असून करोना विषाणू आटोक्यात येण्याची कुठलीही चिन्हे नाहीत. अमेरिकेत सध्या १ लाख ४ हजार रुग्ण असून अध्यक्ष ट्रम्प यांनी शुक्रवारी खासगी कंपन्यांना वैद्यकीय उपकरणे बनवण्यास सक्ती करण्यासाठी युद्धकालीन अधिकारांचा वापर केला आहे. जीइ (जनरल इलेक्ट्रिक) कंपनीला व्हेंटिलेटर तयार करण्याची सक्ती करण्यात आली आहे. या निर्णयांमुळे भविष्यात परिस्थिती सुधारेल अशा आशावाद ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेत एकूण साठ टक्के भागात सर्व व्यवहार बंद आहेत.

पाच मिनिटांत निदान!

अमेरिकेतील एका प्रयोगशाळेने करोना निदानासाठी अत्यंत साधीसोपी चाचणी विकसित केली असून त्यात करोना संसर्ग असल्याचे पाच मिनिटांत समजणार आहे. अ‍ॅबॉट लॅबोरेटरीज या संस्थेने ही चाचणी विकसित केली असून तिला अमेरिकी अन्न व औषध प्रशासनाने आपत्कालीन मान्यता दिली. आरोग्यसेवा पुरवठादारांना पुढील आठवडय़ात या चाचणीसाठी लागणारी सामग्री उपलब्ध करून दिली जाणार आहे. लहान टोस्टरच्या आकाराचे यंत्र यात वापरले जाते. रेणवीय तंत्रज्ञानाच्या मदतीने  ही चाचणी केली जाते. ती नकारात्मक असेल, तर मात्र त्याचा उलगडा तेरा मिनिटांत होणार आहे. अ‍ॅबॉट कंपनीचे अध्यक्ष रॉबर्ट फोर्ड यांनी सांगितले, की विषाणूच्या संसर्गाची चाचणी करण्यासाठी आणखी मार्ग शोधावे लागतील. आमच्या कंपनीने तयार केलेले उपकरण हे चार भिंतीत कुठेही लावता येऊ शकते. जिथे साथीचा मोठा उद्रेक असेल, तेथे चाचण्या करण्यासाठी हे उपकरण कुठेही नेण्यास सोयीचे आहे. या चाचणीला अन्न व औषध प्रशासनाने कायमस्वरूपी मान्यता दिलेली नाही पण आपत्कालीन परिस्थितीत ती वापरण्याची परवानगी प्रयोगशाळांना देण्यात आली आहे.

विषाणूच्या प्रतिमाचित्रणात यश

भारतात करोना विषाणूची प्रतिमा मिळवण्यात पुण्यातील राष्ट्रीय  विषाणू विज्ञान संस्थेच्या (एनआयआव्ही)  वैज्ञानिकांना यश आले आहे. या प्रतिमा इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक छायाचित्र तंत्राने घेण्यात आल्या. भारतात ३० जानेवारी रोजी पहिला करोना रुग्ण सापडला होता, त्याच्या नमुन्याआधारे हे प्रतिमा चित्रण करण्यात आले.

* आताचा विषाणू हा २००२ मधील सार्स- करोना विषाणूशीही साधर्म्य दाखवणारा आहे.

*  भारतातील कोविड १९ विषाणू हा चीनच्या वुहानमधील विषाणूशी ९९.९८ टक्के जुळणारा आहे. अजून तो उत्परिवर्तित होत असून त्यावर औषधे व लसी बनवता येतील.

* पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतील इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी रोगनिदान विभागाचे उपसंचालक डॉ. अतनु बसू यांनी सांगितले की,  विषाणूचा कण हा  ७५ नॅनोमीटरचा दिसतो * त्याचा काटा हा ग्लायकोप्रोटिनचा असून त्यामुळेच तो यजमान पेशीत घुसू शकतो.

* हा विषाणू ७०-८० नॅनोमीटरचा असून त्यात १५ नॅनोमीटरचे कवच आहे. अशा सात विषाणू कणांचे चित्रण यात करण्यात आले.विषाणूंचा आकार गोल दिसून आला आहे.

जग मंदीच्या फेऱ्यात..

करोनामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असून जगाने आर्थिक मंदीच्या अवस्थेत प्रवेश केला आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टॅलिना जॉर्जिव्हा यांनी म्हटले आहे. आताची परिस्थिती निराशाजनक असली तरी २०२१ मध्ये जगाची आर्थिक स्थिती पुन्हा आशादायी स्थितीकडे वाटचाल करील असा दिलासाही त्यांनी दिला आहे.

नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक असलेल्या जॉर्जिव्हा यांनी सांगितले की, आम्ही २०२० व २०२१ या दोन्ही वर्षांच्या संभाव्य आर्थिक स्थितीचा आढावा घेतला असून सध्या तरी जगाने २००८-०९ मधील मंदीपेक्षा जास्त गंभीर मंदीच्या अवस्थेत प्रवेश केला आहे, पण २०२१ मध्ये परिस्थिती सुधारेल असा आमचा अंदाज आहे.

नाणेनिधीच्या संचालक मंडळाच्या कोविड १९ (करोना)  पेचप्रसंग आढावा बैठकीनंतर त्या बोलत होत्या. जर आंतरराष्ट्रीय समुदायाला विषाणूला रोखण्यात यश आले व निधी तरलतेतील समस्या सोडवता आल्या तरच २०२१ मध्ये जगाची आर्थिक स्थिती सुधारेल असे सांगून त्या म्हणाल्या की, अमेरिकेसह सर्व प्रगत देश आता मंदीच्या खाईत लोटले गेले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 933 corona patients across the country abn
First published on: 29-03-2020 at 02:08 IST