Anjana Om Kashyap vs Aalmiki Community : वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी लुधियाना पोलिसांनी ‘आज तक’ या हिंदी वृत्तवाहिनीच्या न्यूज अँकर व व्यवस्थापन संपादक अंजना ओम कश्यप, इंडिया टूडे समुहाचे चेअरमन तथा मुख्य संपादक अरुण पुरी आणि इंडिया टूडे समुहाविरोधात (कंपनी लिव्हिंग मीडिया इंडिया लिमिटेड) गुन्हा दाखल केला आहे. भारतीय वाल्मिकी धर्म समाज (BHAVADHAS) या संघटनेने केलेल्या तक्रारीच्या आधारवर अंजना कश्यप, अरुण पुरी व इंडिया टूडे समुहाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दी इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

संघटनेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की इंडिया टूडे समुहाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून (उदा. फेसबूक) प्रसारित केलेल्या कार्यक्रमात संत वाल्मिकी यांच्याविषयी घृणास्पद टिप्पण्या केल्या होत्या.

वाल्मिकी संघटनेने म्हटलं आहे की कश्यप यांनी केलेल्या टिप्पण्या अत्यंत गंभीर व अपमानकारक आहेत. कश्यप यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण देशातील वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. याप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल केला नाही तर राष्ट्रीय स्तरावर मोठं आंदोलन उभं करू.

अंजना ओम कश्यप यांनी जाहीर माफी मागावी : भाविधस

भाविधसने म्हटलं आहे की आम्ही अंजना ओम कश्यप यांच्याविरोधात तातडीने कारवाई करावी अशी मागणी करतो. तसेच त्यांनी संत वाल्मिकी यांच्याबद्दल केलेल्या अपमानकारक वक्तव्याप्रकरणी सार्वजनिकपणे माफी मागावी.” भाविधसचे राष्ट्रीय समन्यवयक यशपाल चौधरी यांनी लुधियानातील मोहल्ला घाटी येथील पोलीस ठाण्यात जाऊन अंजना ओम कश्यप यांची तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी कश्यप यांच्याविरोधात गुन्हा दाखल केली आहे.

आम आदमी पार्टी देखील आक्रमक

भाविधसचे मुख्य समन्वयक व आम आदमी पार्टीचे नेते विजय दानव म्हणाले, “अंजना कश्यप याना त्वरित अटक करावी अशी आम्ही मागणी करत आहोत. कारण त्यांनी संत वाल्मिकींचा अपमान केला आहे. तसेच वाल्मिकी समुदायाच्या भावना दुखावल्या आहे.” दानव हे पंजाब सरकारच्या दलित विकास बोर्डाचे अध्यक्ष देखील आहेत.

अंजना ओम कश्यप यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम २९९ अंतर्गत धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आणि एससी/एसटीच्या (अत्याचार प्रतिबंधक कायदा) कलम ३ (१) (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.