दिल्लीत भाजप मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न; पोलिसांचा लाठीमार

नवी दिल्ली: सिसोदियांच्या अटकेच्या निषेधार्थ दिल्लीसह अन्य राज्यांमध्ये ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. सोमवारी सकाळी दिनदयाळ उपाध्याय मार्गावरील भाजपच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी केला, मात्र पोलिसांनी त्यांना अडवले. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला. त्यामुळे प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण झाली. सुमारे शंभरहून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दिल्लीसह बंगळूरु, चंडीगड, भोपाळ, जम्मू तसेच, अन्य शहरांमध्ये ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली. आसाम, मध्य प्रदेश, गुजरात, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, हरियाणा, पंजाबमध्येही आंदोलन करण्यात आले. सिसोदियांविरोधात ‘सीबीआय’ने कारवाई करताच, केंद्र सरकार व भाजपने उगारलेला राजकीय सूड असल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे.

पंतप्रधान मोदींच्या पोलिसांनी ‘आप’च्या कार्यालयात घुसून कार्यकर्त्यांना अटक केली असून देशात आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, असे ट्वीट ‘’आप’’च्या वतीने करण्यात आले. ‘बहुतेक सीबीआय अधिकारी मनीष सिसोदियांच्या अटकेच्या विरोधात होते, असे मला समजले आहे. या सर्व अधिकाऱ्यांना त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. त्यांच्याविरुद्ध कोणतेही पुरावे नाहीत. पण, त्यांना अटक करण्याचा राजकीय दबाव इतका प्रचंड होता की सीबीआय अधिकाऱ्यांना त्यांच्या राजकीय स्वामींचे पालन करावे लागले’, अशी तीव्र प्रतिक्रिया मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीटद्वारे दिली. दीर्घकाळ नजरकैद बेकायदेशीर आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आणीबाणी आणि आत्ताची परिस्थिती समांतर असल्याचे ‘आप’चे राष्ट्रीय प्रवक्ते सौरभ भारद्वाज सोमवारी पत्रकार परिषदेत म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिसोदियांच्या अटकेचा काँग्रेस वगळता बहुतांश बिगरभाजप पक्षांनी निषेध केला. काँग्रेसचे प्रवक्ता अभिषेक मनु सिंघवी यांनीही निषेध केला. मात्र, ही भूमिका वैयक्तिक असून पक्षाच्या वतीने मांडलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सिसोदिया हेच कथित दारू घोटाळय़ाचे मास्टरमाइंड अशी प्रतिक्रिया दिल्ली काँग्रेसच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.