Abraham Moshe Avi Dichter On PM Narendra Modi : इस्रायलवर पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासने ७ ऑक्टोबर २०२३ मध्ये मोठा हल्ला केला होता. या हल्ल्यात इस्रायलमध्ये मोठी जीवित आणि वित्तहानी झाली होती. तसेच त्या हल्ल्याला इस्रायलनेही रॉकेट हल्ला करून जशास तसं प्रत्युत्तर दिलं होतं. या युद्धात दोन्ही बाजूचे सुमारे १६०० लोक मृत्यूमुखी पडल्याचं तेव्हा सांगण्यात आलं होतं. तेव्हापासून इस्रायल आणि हमासमध्ये अद्यापही संघर्ष पाहायला मिळतो.

दरम्यान, तेव्हा अमेरिका आणि युरोपातील काही देशांनी इस्रायलला पाठिंबा दर्शवला होता. भारताने देखील इस्रायलच्या बाजूने भूमिका घेतली होती. ७ ऑक्टोबर २०२३ मध्ये जेव्हा इस्रायलवर हल्ला झाला होता, तेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांना फोन केला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या फोनची इस्रायलच्या मंत्र्यांनी आठवण सांगितली आहे.

इस्रायमधील नेते तथा कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री अब्राहम मोशे अवी डिच्टर हे मंगळवारी ते सीएनएन न्यूज १८ च्या रायझिंग इंडिया समिट २०२५ मध्ये बोलत होते. यावेळी अब्राहम मोशे अवी डिच्टर यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॉलची आठवण सांगत ‘हीच खरी मैत्री’ असल्याचं म्हटलं आहे. तसेच तेव्हा मोदींनी जे आवाहन केलं होतं, त्या अहवानाचंही त्यांनी कौतुक केलं आहे.

इस्रायलच्या मंत्र्यांनी काय म्हटलं?

“७ ऑक्टोबर २०२३ रोजी जेव्हा गाझामधून इस्रायवर अचानक हल्ले झाले होते, तेव्हा इस्रायली लोकांवर अत्याचार झाले, त्यांची हत्या झाली, बलात्कार झाले, अपहरण झाले. तेव्हा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना फोन करणारे पहिले जागतिक नेते हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. तसेच तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलला आवश्यक ती कोणतीही मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे जेव्हा वेळ येते तेव्हा हीच खरी मैत्री आहे, असं मंत्री अब्राहम मोशे अवी डिच्टर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गाझातील सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलताना डिच्टर यांनी म्हटलं की, “७ ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर आम्ही इस्रायली संरक्षण आणि राजकीय समस्या परिषदेसमोर तीन ध्येय ठेवली आहेत. एक म्हणजे गाझामधील हमास आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेच्या लष्करी पायाभूत सुविधा नष्ट करणे, दुसरं म्हणजे गाझामधील हमासची राजवट उलथवून टाकणे आणि तिसरे म्हणजे सर्व ओलिसांना सोडणे, या तीन गोष्टी होईपर्यंत युद्ध संपणार नाही”, असंही ते म्हणाले.