पीटीआय, मुंबई
अभ्युदय सहकारी बँकेचे निव्वळ बुडीत कर्जाचे (एनपीए) प्रमाण १२ टक्क्यांपर्यंत विस्तारले आहे. बँकेचे खर्च-उत्पन्न गुणोत्तर ८० टक्क्यांपर्यंत वाढल्याची माहिती सूत्रांनी शनिवारी दिली.रिझव्र्ह बँकेने प्रशासन मानकांबाबत हयगयीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचे निरीक्षण करून अभ्युदय बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेत शुक्रवारी प्रशासकाची नियुक्ती केली. बँकेच्या प्रशासन आणि कारभारातील त्रुटींमुळे बँकेतील बुडीत कर्जाचे प्रमाण वाढत गेले असून, खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ बिघडला आहे. मात्र, मध्यवर्ती बँकेच्या नियुक्त प्रशासकाच्या मार्गदर्शनाखाली सर्व बँकिंग व्यवहार सुरळितपणे सुरू राहणार असल्याचेही रिझव्र्ह बँकेने स्पष्ट केले.
रिझव्र्ह बँकेने नियुक्त केलेले प्रशासक सत्यप्रकाश पाठक यांना मदत करण्यासाठी सल्लागारांची एक समितीही नेमण्यात आली आहे. त्यामुळे या समितीच्या माध्यमातून बँकेचा ताळेबंद स्वच्छ करण्यासाठी कार्यक्षमतेत सुधारणा करून बुडीत कर्ज वसुलीचे प्रयत्न केले जातील. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये बँकेने कार्यकारी नफा कमावला होता. चालू आणि बचत खात्यातील ठेवींचे प्रमाणही चांगले असून, बँकेने वैधानिक तरलता प्रमाण आणि रोख राखीव प्रमाणही सातत्याने राखले असल्याचे सूत्रांनी सांगितले. सहकार-राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या अध्यक्ष संदीप घनदाट यांच्या नेतृत्वाखालील बँक व्यवस्थापनाने परभणीत मतांच्या बेगमीसाठी अतिरिक्त भरती केल्याची माहितीही सूत्रांनी दिली.संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असले तरीही बँकेवर कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. त्यामुळे मध्यवर्ती बँकेने नियुक्त केलेल्या प्रशासकाच्या मार्गदर्शनाखाली सर्व बँकिंग व्यवहार सुरळीतपणे सुरू राहणार आहेत.