Indian Students Accident In Us : अमेरिकेत कार अपघातात दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. न्यू यॉर्कमधील क्लीव्हलँड स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये हे विद्यार्थी शिक्षण घेत होते. दरम्यान, या घटनेसंदर्भातील माहिती भारतीय दूतावासाने मंगळवारी दिली आहे. कार अपघातातील या विद्यार्थ्यांची नावे मानव पटेल (वय २० ) आणि सौरव प्रभाकर (वय २३) अशी या विद्यार्थ्यांची नावं असून त्यांची ओळख पटली आहे.

माहितीनुसार, १० मे रोजी ईस्ट कोकालिको टाउनशिपमध्ये अपघात झाला तेव्हा प्रभाकर कार चालवत होता. तसेच त्यांच्या गाडीच्या पुढच्या सीटवर आणखी एक व्यक्ती बसलेला होता. तो व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याचं सांगितलं जात आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

अपघाताच्या घटनेनंतर समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये या दोन विद्यार्थ्यांची गाडी रस्त्यावरून वळून झाडाला धडकून पुलावर आदळली असल्याचं सांगितलं जात आहे. न्यू यॉर्कमधील भारतीय दूतावासाने क्लीव्हलँड स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये दोन भारतीय विद्यार्थ्यांच्या अपघाती मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.

या संदर्भात दिलेल्या एका निवेदनात भारतीय दूतावासाने म्हटलं की, अपघातात मृत्यू झालेल्या दोन भारतीय विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांच्या आम्ही संपर्कात आहोत. सर्व शक्य ती मदत करण्यात येत आहे. या कठीण काळात आमच्या संवेदना आणि प्रार्थना त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत, असं निवेदनात म्हटलं आहे.

अपघाताची घटना कधी घडली?

दरम्यान, अपघाताची चौकशी करणाऱ्या कोरोनरच्या अहवालात असं म्हटलं आहे की दोन्ही विद्यार्थ्यांचा मृत्यू आघातजन्य जखमांमुळे झाला आहे. अपघाताबाबत स्थानिक पोलीस आणि लँकेस्टर काउंटी कोरोनर कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात शनिवार (१० मे) सकाळी ७ वाजता ब्रेकनॉक टाउनशिप परिसरातील पेनसिल्व्हेनिया टर्नपाइकवर घडला. घटनेच्या वेळी सौरव प्रभाकर कार चालवत होता. मात्र, अचानक कारवरील नियंत्रण सुटलं आणि भरधाव कार झाडावर आणि एका पुलाच्या खांबावर आदळली. यामध्ये दोन्ही भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.