चार जणांनी बलात्कार केल्याच्या गुन्ह्याची तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पोलीस ठाणेदारानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील ललितपूर येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस ठाणेदारासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. हा बलात्कार करणारा पोलीस ठाणेदार फरार झाला होता. मात्र त्याला बुधवारी सायंकाळी प्रयागराज येथून अटक करण्यात आली. या प्रकरणानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. यावर विविध कलाकार मत व्यक्त करताना दिसत आहेत. नुकतंच अभिनेता रितेश देशमुखने याप्रकरणी ट्विट केले आहे.

रितेश देशमुखने नुकतंच त्याच्या अधिकृत ट्विटवर एक ट्विट केले आहे. यात त्याने एका वृत्तवाहिनीचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यासोबत त्याने उत्तरप्रदेशात घडलेल्या धक्कादायक घटनेबाबतही भाष्य केले आहे. याबाबत तो म्हणाला, “जर हे खरं असेल तर यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही. जर रक्षकच भक्षक झाला तर सर्वसामान्य माणसाने न्याय मागण्यासाठी कुठे जायचे? अशा लोकांना भरचौकात सर्वांसमोर मारायला पाहिजे. त्यांच्यावर तात्काळ कारवाई करत कठोरात कठोर शिक्षा द्या”, अशी मागणी रितेशने केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. ललितपूरमधील एका अल्पवयीन मुलीला चार जणांनी २२ एप्रिल रोजी भोपाळला नेले आणि तीन दिवस तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर या आरोपींनी या मुलीला ललितपूरमधील पाली पोलीस ठाण्याजवळ आणून सोडले. ही मुलगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेली.

त्यानंतर तिथे पोलीस ठाण्याचा प्रमुख तिलकधारी सरोज याने तिला एका खोलीत डांबून ठेवले आणि तिच्यावर बलात्कार केला. हे प्रकरण वरिष्ठांकडे गेल्यानंतर हा ठाणेदार फरार झाला. पोलिसांनी या मुलीवर बलात्कार करणाऱ्या चार जणांना अटक केली. या मुलीच्या मावशीलाही सहआरोपी करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. फरार झालेल्या सरोजला प्रयागराज येथून अटक करण्यात आली़. या प्रकरणी स्टेशन प्रमुखासह ६ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पाली पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार या आरोपींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.