Firefights erupt between Pakistani and Afghan forces : काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे झालेल्या पाकिस्तानी हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर शनिवारी उशिरा संघर्ष पेटल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये तालिबानच्या नेतृत्वाखालील अफगाण सैन्याने ड्युरँड लाईनवरील अनेक पाकिस्तानी लष्करी चौक्या ताब्यात घेतल्या आहेत. ज्यामध्ये कुनार आणि हेलमंड प्रांतातील चौक्यांचाही समावेश आहे, असे अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे.
“तालिबान सैन्याने ड्युरँड लाईनवरील कुनार आणि हेलमंड प्रांतातील पाकिस्तानी लष्कराच्या अनेक चौक्यांवर ताबा मिळवला आहे,” असे अफगाण संरक्षण अधिकाऱ्याने एका निवेदनात म्हटले आहे.
TOLOnews ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमेवर सुरू असलेल्या संघर्षात किमान १२ पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत आणि इतर अनेक जण जखमी झाले आहेत. बहरामचा जिल्ह्यातील शाकीज, बीबी जानी आणि सालेहान भागात तसेच पाकतीयातील आर्यूब झाझी जिल्ह्यातही तीव्र संघर्ष झाल्याचे वृत्त आहे.
पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की अफगाणिस्तानकडून विनाकारण करण्यात आलेल्या गोळीबाराला त्यांचे सैन्य पूर्ण ताकतीने प्रत्तुत्तर देत आहे.
अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इनायतुल्लाह खोवाराझमी यांनी सांगितले की ही कारवाई पाकिस्तानने अफगाण एअरस्पेसचे उल्लंघन केल्याच्या प्रत्त्युत्तरादाखल करण्यात आली आहे. तसेच त्यांनी सांगितले की कारवाई स्थानिक वेळेनुसार मध्यरात्रीच्या सुमारस करण्यात आली. “जर विरोधी बाजूने पुन्हा अफगाणिस्तानच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केले, तर आमचे सशस्त्र दल त्यांच्या हवाई हद्दीचे संरक्षण करण्यास सज्ज आहे आणि जोरदार प्रत्युत्तर देईल,” असे खोवाराझमी पुढे म्हणाले.
यादरम्यान कतारने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील वाढत्या सीमा तणावावर चिंता व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी दोन्ही बाजूंना संयम राखण्याचे आणि चर्चेद्वारे आपले मतभेद सोडवावेत असे आवाहन केले आहे.
पाकिस्तानी हवाई हल्ल्याला तालिबानचे प्रत्युत्तर
पाकिस्तानने काबूलच्या जवळ एअरस्ट्राईक केल्याच्या काही दिवसानंतर सीमेवर हा संघर्ष पेटला आहे. अफगाणिस्तानच्या २०१ खालिद बिन वालिद आर्मी कॉर्प्सने म्हटले आहे की, पाकिस्तानच्या या कृतीमुळे नांगरहार आणि कुनार येथील पाकिस्तानी लष्करी ठिकाणांना लक्ष्य करत प्रत्युत्तर दाखल कारवाई सुरू करण्यात आली. मात्र पाकिस्तानने अद्याप हे हल्ले झाल्याचे मान्य किंवा नाकारलेले नाही.
अफगाण संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, “रात्रीच्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानच्या बाजूच्या पायाभूत सुविधा आणि उपकरणे नष्ट झाली.” तसेच त्यांनी दावा केला की, कुनार आणि हेलमंड प्रांतातील प्रत्येकी एक चौकी उद्ध्वस्त करण्यात आली असून पाकिस्तानी लष्कराचे सैनिक ठार झाले आहेत आणि तालिबानच्या सैनिकांनी त्यांचे अनेक शस्त्रे आणि वाहने देखील उद्ध्वस्त केली आहेत.