Afghanistan-Pakistan Military Conflict: गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये लष्करी संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अफगाणिस्तानने नुकताच पाकिस्तानचे ५८ सैनिक मारल्याचा दावा केला होता. आता या दाव्याला उत्तर देताना पाकिस्तान लष्कराने म्हटले आहे की, अफगाणिस्तानच्या सीमेवर रात्री झालेल्या चकमकीत त्यांचे २३ सैनिक आणि २०० हून अधिक तालिबानी सैनिक मारले गेले आहेत.
दरम्यान मे मध्ये भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर ऑपरेशन सिंदूरद्वारे हवाई हल्ले केले होते. त्यावेळीही पाकिस्तानने भारताची लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला होता. पण, त्यांनी अद्याप याचा एकही पुरावा दिलेला नाही.
पाकिस्तानी लष्कराने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, “तालिबानी छावण्या, चौक्या आणि दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांवर अचूक हल्ले तसेच प्रत्यक्ष छापे टाकण्यात आले आहेत. यामध्ये २३ पाकिस्तानी सैनिक ठार झाले आणि २९ सैनिक जखमी झाले आहेत. तर, २०० हून अधिक तालिबानी आणि संबंधित दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.”
अफगाणिस्तानातील तालिबान सैन्याने शनिवारी रात्री उशिरा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केल्याचे आणि पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी काबूलवर केलेल्या हवाई हल्ल्याचा हा बदला असल्याचे म्हटले आहे.
२०२१ मध्ये तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून सीमावर्ती भागात दोन्ही देशांमध्ये वारंवार संघर्ष होत आहे, परंतु पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केल्याने हा वाद वाढू शकतो.
तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी रविवारी सांगितले की, अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ५८ सैनिक मारले गेले आहेत आणि सुमारे ३० सैनिक जखमी झाले आहेत. याचबरोबर ९ तालिबानी सैनिकांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले होते.
अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, त्यांच्या सैन्याने पाकिस्तानच्या सततच्या आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून शनिवारी रात्री उशिरा सीमेवर यशस्वी कारवाई केली. भविष्यात अफगाणिस्तानच्या प्रादेशिक अखंडतेचे कोणतेही उल्लंघन केल्यास त्याला जशास तसे उत्तर देण्यात येईल.
अफगाणिस्तानची सरकारी वृत्तसंस्था आरटीएने वृत्त दिले आहे की, या कारवाईत दक्षिण हेलमंड प्रांताच्या सीमेवरील भागात तीन पाकिस्तानी लष्करी चौक्या ताब्यात घेण्यात आल्या आणि यावेळी पाकिस्तानचे १५ सैनिक ठार झाले आहेत.
या आठवड्याच्या सुरुवातीला, अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानवर काबूल आणि पूर्व अफगाणिस्तानातील एका बाजारपेठेत बॉम्बहल्ले केल्याचा आरोप केला होता. पण, पाकिस्तान यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. अफगाणिस्तानच्या सरकारी माध्यमांनीही अनेक पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचे वृत्त दिले होते, परंतु पाकिस्तानने याला दुजोरा दिलेला नव्हता.