Sexual harassment student case गेल्या काही दिवसांपूर्वी लैंगिक छळामुळे त्रासून ओडिशातील बालासोरमधील एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली. आता पुन्हा ग्रेटर नोएडामध्ये अशीच एक घटना घडली आहे. ग्रेटर नोएडामधील शारदा विद्यापीठातील बीडीएसच्या दुसर्या वर्षाला असणार्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. प्राध्यापकांकडून होणाऱ्या छळामुळे तिने हे पाउल उचलल्याचे सांगितले जात आहे.
सुसाईड नोटमधून काय समोर आले?
ग्रेटर नोएडामधील शारदा विद्यापीठातील एका विद्यार्थिनीने प्राध्यापकांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. नॉलेज पार्क पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये ही घटना घडली. घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे, या सुसाईड नोटमध्ये पीडितेने तिच्या शिक्षकांवर छळाचा आरोप केला आहे. सुसाईड नोटमध्ये विद्यार्थिनीने लिहिले, “जर मी मेले तर पीसीपी आणि डेंटल मटेरियलचे शिक्षक जबाबदार असतील. त्यांना तुरुंगात टाकले जावे, असे मला वाटते. त्यांनी मला मानसिक त्रास दिला. त्यांनी माझा अपमान केला. मी त्यांच्यामुळे बऱ्याच काळापासून तणावात आहे. त्यांनीही असेच सहन करावे असे मला वाटते,” असे पिडीत विद्यार्थिनीने सुसाईड नोटमध्ये लिहिले.
तिने या सुसाईड नोटमध्ये दोन शिक्षकांची नावे नमूद केली आहेत. या घटनेनंतर, विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनाच्या विरोधात निदर्शने केली आणि त्यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी केली, त्यामुळे कॉलेज कॅम्पसमध्ये तणाव वाढला. पोलीस कर्मचारी आणि निदर्शक विद्यार्थ्यांमध्ये वादही झाला. पिडीत विद्यार्थिनीच्या कुटुंबाने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन शिक्षकांना ताब्यात घेतले आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
बालासोर आत्महत्या प्रकरण
ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने शिक्षकाने छळ केल्याच्या आरोपावरून स्वतःला पेटवून घेतल्यानंतर काही दिवसांनी ही घटना घडली. तिला गंभीर दुखापत झाली आणि नंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थिनीने कॉलेजमधील एका शिक्षकाविरोधात लैंगिक छळाची तक्रार केली.
मात्र, तिच्या तक्रारीकडे कोणीही लक्ष न दिल्यामुळे विद्यार्थिनीने कॉलेजच्या आवारातच स्वतःला पेटवून घेतले. पीडिता ९५ टक्के भाजली आणि १४ जुलै रोजी एम्स भुवनेश्वरमध्ये तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी संबंधित विभागप्रमुख आणि कॉलेजच्या प्राचार्याला अटक केली.