नायजेरियन नागरिकाच्या खून प्रकरणी गोव्यातील एका युवकास अटक करण्यात आली आहे. नायजेरियन नागरिकाचा खून झाल्याच्या घटनेनंतर तेथील नायजेरियन समुदायाच्या लोकांमध्ये संतप्त भावना निर्माण झाल्या होत्या. विशेष चौकशी पथकाने नायजेरियन नागरिक ओबोडो उझोमा सिमीऑन याच्या खून प्रकरणी सुरेंद्र पाल याला काल रात्री अटक केली. गेल्या आठवडय़ात पारा या खेडय़ात नायजेरियन नागरिकांच्या गटाशी झालेल्या संघर्षांत नायजेरियाच्या नागरिकाचा खून झाला होता. पाल याला उत्तर गोव्यातील छापोरा या सागर किनारी असलेल्या खेडय़ात अटक करण्यात आली. मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी असा दावा केला केला, की हा खून म्हणजे अमली पदार्थाशी निगडित असलेला गुन्हा आहे. सिमॉन हा गेल्या आठवडय़ात भोसकलेल्या अवस्थेत सापडला होता व नंतर त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर नायजेरियन लोकांनी राष्ट्रीय महामार्ग अडवून धरले होते.
गेल्या काही वर्षांतील आकडेवारी बघता गोव्यात अमली पदार्थाच्या गुन्ह्य़ात अटक करण्यात आलेले बहुतांश नागरिक हे नायजेरियन आहेत, असे सांगून ते म्हणाले, की कोकेन, हेरॉइन, गांजा व चरस या नैसर्गिक अमली पदार्थाची विक्री करताना नायजेरियन नागरिक पकडले गेले आहेत.  
अमली पदार्थाच्या गुन्ह्य़ात नायजेरियन नागरिक अधिक
दरम्यान गोव्यात गेल्या तीन वर्षांत अमली पदार्थाशी निगडित असलेल्या गुन्ह्य़ांत वाढ झाली आहे, असे राज्य पोलिसांकडे असलेल्या नोंदीवरून दिसून येते. अमली पदार्थविरोधी पथक व जिल्हा पोलिसांनी २५ परदेशी नागरिकांवर गुन्हे दाखल केले. त्यात १८ नायजेरियन आहेत. त्यांच्यावर नारकोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस अ‍ॅक्ट या कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. २०११ मध्ये १० नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली होती, तर २०१० मध्ये नऊ नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली होती. पोलिस अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी सांगितले, की सरकारने नायजेरियन नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग अडवल्यानंतर त्यांची धरपकड केली. त्यामुळे राज्यातील अमली पदार्थ व्यापार कमी होण्याची शक्यता अपेक्षित आहे.