भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यासह महाराष्ट्र भाजपाचे शिष्टमंळाने आज (सोमवार) दिल्लीत केंद्रीय गृह सचिवांची भेट घेतली. महाराष्ट्रातील मागील काही दिवसांमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जवळपास २० मिनीटं चर्चा केली. याचबरोबर, दिल्लीतील विशेष टीम महाराष्ट्रात पाठवून सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी देखील गृह सचिवांकडे करण्यात आली. या भेटीनंतर सोमय्यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत सविस्तर माहिती दिली.

किरीट सोमय्या यांनी सांगितलं की, “केंद्र सरकारचे गृह सचिव अजय भल्ला यांच्याशी आमची बरीच विस्तृत चर्चा झाली. २०-२५ मिनिटांच्या चर्चेत, त्यांच्या चेहऱ्यावर देखील चिंता दिसत होती. ज्या प्रकारे महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, ज्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. सामान्य नागरिक, निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यांच्यावर ज्या प्रकारे हल्ले, अत्याचार सुरू आहेत. धमक्या दिल्या जात आहेत. जिवंत गाडण्याची भाषा मुख्यमंत्र्यांचे प्रवक्ते करत आहेत. या संदर्भात आणखी तक्रारी इथे आलेल्या आहेत, असं दिसून आलं आहे. आज आम्ही अशी सात उदाहरणं गृहमंत्रालयास दिली आहेत.”

तसेच, “केवळ मुद्दा किरीट सोमय्यांचा नाही.तर मुद्दा नौदल अधिकाऱ्यापासून एका झोपडपट्टीत राहणाऱ्या व्यक्तीचं मुंडण केलं जातं, नौदल अधिकाऱ्याच्या घरात शिवसेनेचे गुंडं हे उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून जातात आणि मारहाण करतात. मनसुख हिरेनची उद्धव ठाकरेंनी नियुक्त केलेले दोन पोलीस अधिकारी सुपारी घेऊन हत्या करतात. आमदार, खासदाराला जिवंत गाडण्याची धमकी दिली गेली आणि किरीट सोमय्या ज्यांना केंद्र सरकारने झेड सुरक्षा दिलेली आहे, त्यांना पोलीस स्टेशनच्या परिसरात, पोलिसांच्या उपस्थितीत त्यांच्या सहकार्यांनी शिवसेनेचे ७०-८० गुंडं त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करतात. यासाठी विशेष पथक पाठवलं पाहिजे, परिस्थिती चिंताजनक आहे. गृह सचिवांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे, हा विषय आम्ही गांभीर्याने अभ्यासत आहोत, गरज पडली तरी इथली टीम देखील तिथे जाईल.” असंही यावेळी किरीट सोमय्या यांनी सांगितलं.