After JeM Lashkar commander big admission on Operation Sindoor : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर येथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले होते. यानंतर काही दिवसांपूर्वी जैश-ए-मोहमदच्या कामांडरचा एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यामधून बहावलपूर कॅम्पशी मसूद अजहरचा संबंध नसल्याचा पाकिस्तानाचा दावा उघडा पडला होता. याच्या काही दिवसांनंतरच लष्कर-ए-तैयबाच्या एका ऑपरेटीव्हने मान्य केले आहे की मुरिदके येथील मरकझ तैयबा येथील दहशतवादी गटाचे मुख्यालय ऑपरेशन सिंदूर दरम्यान उद्ध्वस्त केले गेले होते.
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात या ऑपरेटीव्हचा एक व्हिडीओ व्हायरल होते आहे, हा व्यक्ती लष्कर-ए-तैयबाचा कमांडर कासिम असून तो व्हिडीओमध्ये ७ मे रोजी उद्ध्वस्त करण्यात आलेला मुरिदके येथील दहशतवादी तळ पुन्हा बांधण्याचे काम सुरू असल्याचे सांगताना दिसत आहे. इतकेच नाही तर हा तळ पूर्वीपेक्षा मोठा बांधला जात असल्याचेही त्याने मान्य केले. मुरिदके हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील शेखूपुरा जिल्ह्यातील एक शहर आहे.
“सध्या मुरिदके येथे हल्ल्यात (भारताच्या) उद्ध्वस्त झालेल्या मरकझ तैयबा येथे पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. ईश्वराच्या कृपेने ही मशिद पूर्वीपेक्षा मोठी बांधली जाईल,” असे कासिम व्हिडिओमध्ये सांगताना दिसत आहे. तो एका बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी उभा असल्याचे पाहायला मिळत आहे. एनडीटीव्हीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
कासिम याने मान्य केले की अनेक दहशतवादी (मुजाहिदीन आणि तलाबा (विद्यार्थी) यांनी उद्ध्वस्त झालेल्या मरकझ तैयबा मशिदीतून प्रशिक्षण घेतले आहे आणि विजय (फैज) मिळवला आहे. मात्र या नष्ट करण्यात आलेल्या इमारतीत दहशतवादी राहत नव्हते असा दावा पाकिस्तानने केला होता.
दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये लष्कर-ए-तैयबाचा (LeT) ऑपरेटीव्ह पाकिस्तानमधील तरुणांना मुरिदके येथील मरकझ तैयबा येथे दौरा-ए-सुफा मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करताना दिसत आहे. दौरा ए सुफा हा एका दहशतवादी प्रशिक्षण प्रोग्राम आहे ज्यामध्ये जिहादी प्रशिक्षण प्रोग्रामचा भाग म्हणून धार्मिक शिकवणीसह मूलभूत प्रशिक्षण दिले जाते.
भारतीय लष्कराने ७ मे रोजी पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईमध्ये ९ दहशतवादी तळ उद्भ्वस्त करण्यात आले होते, ज्यामध्ये लष्कर-ए-तैयबाचा मुरिदके येथील दहशतवादी तळ देखील होता. ही कारवाई जम्मू-काश्मीर येथे दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत करण्यात आली होती.
भारताने बहावलपूरमध्ये घुसून केला हल्ला
यापूर्वी जैश ए मोहम्मदच्या कमांडरने कबुली दिली की ७ मे रोजी भारताने बहावलपूरच्या दहशतवादी तळांवर जो हल्ला केला त्यात दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबाचे तुकडे तुकडे झाले. कमांडर मसूद इलियासने ही कबुली दिली आहे. या हल्ल्यात मसूद अझरच्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागला. त्याच्या कुटुंबातले अनेक सदस्य मारले गेले असंही त्याने म्हटलं होते.
बहावलपूर हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एक शहर आहे. जैश ए मोहम्मदचं मुख्याल मरकझ सुभान अल्लाह या ठिकाणी आहे. पाकिस्तानवर भारताने १०० किमी आत घुसून हा हल्ला केला होता. ज्या हहल्ल्यात संपूर्ण तळ उद्ध्वस्त झाला होता. दहशतवादी मसूद अझहरचं कुटुंब या ठिकाणी राहात होतं. सॅटेलाईट फोटोंमधून भारताच्या हल्ल्यात मरकझ सुभान अल्लाह उद्ध्वस्त झाल्याचं दिसून आलं होतं.