Mamata Banerjee Chief Minister Of West Bengal On Bengali Language Row: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी आरोप केला की, केंद्र सरकारने भाजपशासित राज्यांमध्ये बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्याचे निर्देश देणारी अधिसूचना “गुप्तपणे” जाहीर केली आहे. यावेळी त्यांनी भाजपाला इशारा दिला की, जर बंगालींना डिटेन्शन कॅम्पमध्ये पाठवले, तर “बंगाल तुम्हाला राजकीय डिटेन्शन कॅम्पमध्ये पाठवेल”.
कोलकाता येथे कॉलेज स्क्वेअर ते डोरिना क्रॉसिंगपर्यंतच्या मोर्चाचे नेतृत्व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले. यावेळी त्यांनी भाजपशासित राज्यांमध्ये बंगाली भाषिक लोकांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला. या मोर्चात अभिषेक बॅनर्जी यांच्यासह तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.
मोर्चानंतर एस्प्लेनेड येथील सभेत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, “त्यांनी (केंद्र सरकारने) फेब्रुवारीमध्ये गुप्तपणे एक अधिसूचना जाहीर केली होती, ज्यामध्ये बांगलादेशींना ताब्यात घेण्याचा उल्लेख होता. त्यांनी ती अधिसूचना भाजपशासित राज्यांना पाठवली आहे. आम्ही त्या अधिसूचनेला आव्हान देऊ. ही कृती आणीबाणीपेक्षा मोठी आहे. जर हे असेच चालू राहिले, तर मी बंगालीमध्येच जास्तीत जास्त बोलेन; मला अटक करण्याचे धाडस करा.”
पुढे बोलताना बॅनर्जी म्हणाल्या की, “भाजपा मुळात गरीबविरोधी आहे. त्यांनी बंगाली कामगारांना त्यांच्या कौशल्यासाठी बोलावतात आणि नंतर त्यांना ताब्यात घेऊन त्यांना डिटेन्शन कॅम्पमध्ये पाठवत आहेत. बंगालींवर असे अत्याचार आपण सहन करू शकत नाही.”
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वावर लक्ष्य करत बॅनर्जी यांनी प्रश्न केला की, “दिल्लीवाल्यांना काय वाटते? ते या देशाचे जमीनदार आहेत का? तुम्हाला पाहिजे त्याला तुरुंगात टाकाल का? जर तुम्ही बंगाली बोललात, तर तुम्हाला बांगलादेशी म्हणायचे की रोहिंग्या? मी या गोष्टी सहन करणार नाही.”
पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशात ममता बॅनर्जी यांनी बंगाली लोकांच्या अटकेला राजकीय मुद्दा म्हणून मांडले आहे. “तुम्ही बंगालींना का त्रास देत आहात? त्यांनी काय केले आहे? जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही बंगालला त्रास द्याल, तर मी देशभर फिरेन. आम्ही सर्व मातृभाषांचा आदर करतो. तुम्ही बंगाली लोकांबद्दल इतका अनादर का करता?” असा प्रश्नही ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला.