गेल्या काही दिवसांत दहशतवाद्यांकडून पैसे लुटण्याचे वाढलेले प्रकार आणि दक्षिण काश्मीरमधील अशांततेच्या पार्श्वभूमीवर जम्मू अॅण्ड काश्मीर बँकेने आपल्या शाखांमधील रोखीचे व्यवहार थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जम्मू अॅण्ड काश्मीर बँकेच्या ४० शाखांमधील व्यवहार ठप्प होणार आहेत. यापैकी बहुतेक शाखा या पुलवामा आणि शोपियान येथील आहेत. गेल्या सहा महिन्यात काश्मीरमध्ये बँकेवर १३ वेळा हल्ला करण्यात आला असून तब्बल ९२ लाखांची रोकड लुटून नेण्यात आली आहे. यापैकी चार घटना या महिन्याच्या सुरूवातीलाच घडल्या आहेत.
१ मेला दहशतवाद्यांनी जम्मू अॅण्ड काश्मीर बँकेच्या पैसे नेणाऱ्या गाडीवर हल्ला चढवला होता. यावेळी दहशतवाद्यांच्या गोळीबारात पाच पोलीस आणि दोन बँक अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आणखी तीन ठिकाणी बँक लुटण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी बँकेला त्यांच्या शाखांमधील रोखीचे व्यवहार थांबवण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार बँकेने त्यांच्या ४० शाखांमधील व्यवहार थांबवल्याची माहिती जम्मू अॅण्ड काश्मीर बँकेच्या कॉर्पोरेट व माहिती विभागाचे प्रमुख सज्जाद बझाझ यांनी दिली. त्यानुसार आता या ४० शाखांमध्ये रोखीचे व्यवहार सोडून इतर व्यवहार सुरू राहतील. त्याऐवजी नजीकच्या सुरक्षित शाखांमध्ये पैशांची व्यवस्था केली जाईल. नागरिकांनी त्याठिकाणी जाऊन पैसे काढावेत, असे बझाझ यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी दहशतवादी हे पैसे लुटून नेत असल्याचा दावा केला होता. मात्र, हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेने आपल्याकडे पुरेसे पैसे असल्याचे सांगत हा दावा फेटाळून लावला होता.