PM Modi Cyprus Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. १५ जून रोजी पंतप्रधान मोदी सायप्रसमध्ये पोहोचले असून ऑपरेशन सिंदूरनंतर त्यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्व असल्याचं बोललं जातं. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी हे तीन देशांना भेटी देणार आहेत. यामध्ये कॅनडाला देखील भेट देणार असून ते कॅनडात जी ७ शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर मोदी क्रोएशिया या देशाला भेट देणार आहेत.
पंतप्रधान मोदी यांचा या दौऱ्यात द्विपक्षीय संबंध वाढवण्यावर भर असणार असून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे संबंध मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिड्स यांच्या निमंत्रणावरून मोदींनी ही भेट दिल्याचं सांगितलं जात आहे. पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर या दौऱ्यात १०० अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या दौऱ्यात काही महत्वाच्या करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
भारतीय पंतप्रधानांचा मागील काही दशकांहून अधिक काळानंतर सायप्रसला हा पहिलाच दौरा आहे. त्यामुळे या दौऱ्याला एक खास महत्व प्राप्त झालं आहे. १९८२ मध्ये इंदिरा गांधी यांनी आणि २००२ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी सायप्रसचे दौरे केले होते. आता या दौऱ्यात पंतप्रधान मोदी हे निकोसिया येथे राष्ट्राध्यक्ष क्रिस्टोडौलिड्स यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. दोन्ही देशातील ही भेट धोरणात्मक आणि राजनैतिक व आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते.
दरम्यान, तुर्कीये आणि पाकिस्तानमधील वाढत्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर भारताच्या पंतप्रधानांचा हा दौरा महत्वाचा आहे. कारण तुर्कीयेने काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला वारंवार पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं आहे. तसेच भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या लष्करी तणावातही तुर्कीयेने पाकिस्तानला पाठिंबा दिला. तसेच सायप्रस कायम दहशतवादाविरुद्ध आवाज उठवत राहिला आहे. २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर सायप्रसने हिंसाचाराचा निषेध केला आहे. तसेच पाकिस्तानकडून सीमापार दहशतवादाचा मुद्दा युरोपियन युनियन पातळीवर उपस्थित करण्याचा आपला हेतू असल्याचंही सायप्रसने भूमिका मांडलेली आहे. तसेच सायप्रसने भारताच्या भूमिकेला सातत्याने पाठिंबा दिलेला आहे.