Voter Adhikar Yatra In Bihar : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी मागील काही दिवसांपासून केंद्रीय निवडणूक आयोगाला सातत्यानं लक्ष्य करत आहेत. मतदार याद्यांमधील कथित अनियमिततेच्या आरोपांवरून निवडणूक आयोगावर आणि भाजपावर मत चोरीचा आरोप करत घणाघाती टीका करत आहेत. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेत काही पुराव्यांचंही सादरीकरण केलं होतं.

तेव्हापासून राहुल गांधी सातत्याने मत चोरीचा आरोप करत सत्ताधाऱ्यांवर टीका करताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान, राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये ‘व्होटर अधिकार यात्रा’ काढली होती. या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी आणि तेजस्वी यादव बिहारच्या विविध शहरात जाऊन सभा आणि मेळावे घेतले. या व्होटर अधिकार यात्रेदरम्यान राहुल गांधींनी भाजपा आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली.

दरम्यान, या मतदार हक्क यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने जाहीर सभेत बोलताना राहुल गांधींनी आणखी एक मोठा इशारा दिला आहे. ‘मत चोरीच्या अणुबॉम्बनंतर आता हायड्रोजन बॉम्ब येणार आहे’, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त जनसत्ताने दिलं आहे. तसेच या संदर्भातील राहुल गांधींच्या भाषणाचा एक व्हिडीओही काँग्रेसने एक्स (ट्विटर) शेअर देखील केला आहे.

राहुल गांधींनी काय म्हटलं?

“ज्या शक्तींनी महात्मा गांधींची हत्या केली, तिच शक्ती आता संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आम्ही त्यांना भारताचं संविधान नष्ट करू देणार नाहीत. आम्ही त्यासाठी बिहारमध्ये मतदार हक्क यात्रा काढली आणि या यात्रेला बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. मात्र, मतदार हक्क यात्रेदरम्यान भाजपाच्या काही लोकांनी काळे झेंडे दाखवले. आता मी भाजपाच्या लोकांना सांगतो की तु्म्ही लक्ष देऊन ऐका. तुम्ही अणुबॉम्बचं नाव ऐकलं असेल. मात्र, त्यापेक्षा मोठं काय असतं? अणुबॉम्ब पेक्षा मोठा हायड्रोजन बॉम्ब असतो. महादेवपुरामध्ये आम्ही अणुबॉम्ब दाखवला. मात्र, आता हायड्रोजन बॉम्ब येणार आहे. मत चोरीची जी सत्यता आहे ती आता संपूर्ण देशाला समजणार आहे. मी आता सांगतो, मत चोरीच्या हायड्रोजन बॉम्बनंतर पंतप्रधान मोदी लोकांना त्यांचा चेहरा दाखवू शकणार नाहीत”, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.