पीटीआय, श्रीहरिकोटा (आंध्र प्रदेश) : ISRO Aditya L1 Solar Mission Launch यशस्वी चांद्रमोहिमेनंतर भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) शनिवारी सकाळी महत्त्वाकांक्षी सूर्यमोहिमेअंतर्गत ‘आदित्य एल-१’ यानाचे प्रक्षेपण केले. श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण तळावरून शनिवारी सकाळी ११.५० वाजता पीएसएलव्ही प्रक्षेपकाच्या साहाय्याने हे यान अवकाशात झेपावले. सुमारे १२५ दिवसांत १५ लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर सूर्याच्या सर्वात जवळ मानल्या जाणाऱ्या ‘एल-१’ पॉइंटभोवतीच्या हेलो कक्षेत पोहोचेल. हे यान शास्त्रीय अभ्यासासाठी सूर्याची चित्रे पाठवेल, असे ‘इस्रो’ने स्पष्ट केले.

‘इस्रो’चे प्रमुख एस. सोमनाथ यांनी सांगितले, की ‘आदित्य एल-१’ अवकाश यान २३५ बाय १९ हजार ५०० किलोमीटर लंबवर्तुळाकार अपेक्षित अचूक कक्षेत प्रक्षेपकाद्वारे सोडण्यात आले आहे. ‘आदित्य एल-१’च्या प्रक्षेपणावेळी इस्रोच्या कार्यालयात केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, प्रकल्प संचालक निगार शाजी आणि मोहीम संचालक बिजू उपस्थित होते.

हेही वाचा >>> Aditya L1 Mission Launch : ‘इस्रो’नं ‘आदित्य एल१’बाबत दिली नवीन माहिती, जाणून घ्या…

शाजी यांनी सांगितले, की प्रक्षेपकाने यानाला नेहमीप्रमाणे सुनिश्चित कक्षेत निर्दोष पद्धतीने प्रस्थापित केले. यानाचे ‘सौर पॅनेल’ तैनात केली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी या यशाचे वर्णन ‘सूर्यप्रकाशाने झळाळलेला क्षण’ असे केले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवकाश क्षेत्राला दिलेल्या खंबीर पाठिंब्याबद्दल त्यांचे यावेळी आभार मानले.

महत्त्वाची मोहीम..

‘आदित्य- एल १’ या भारताच्या पहिल्या सूर्यमोहिमेच्या यशस्वी सुरुवातीनंतर, देश आता काही ‘प्रेडिक्शन मॉडेल्स’ तयार करू शकतो, तसेच हवामान बदलाला लढा देण्यासाठी ‘लवचिक योजना’ (रेझिलिअन्स प्लान) तयार करू शकतो, असे इस्रोचे माजी अध्यक्ष जी. माधवन नायर यांनी सांगितले.

‘सूर्याच्या किरणोत्सर्गाची दीर्घकालीन परिवर्तनशीलता हाही हवामान बदलाच्या अभ्यासातील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या मोहिमेच्या माध्यमातून या सर्व क्षेत्रांमध्ये मूभूत ज्ञान मिळवता येईल’, असे नायर म्हणाले.

‘एल-१’ म्हणजे काय?

  • ‘एल-१’ हा सूर्य आणि पृथ्वीच्या मधील एक बिंदू आहे. अंतराळातील मोठे वस्तुमान असलेल्या दोन वस्तूंमध्ये (तारे, ग्रह, उपग्रह इत्यादी) गुरुत्वाकर्षण असते.
  • या दोन वस्तूंमधील काही बिंदू असे असतात की तेथे दोन्हींचे गुरुत्वाकर्षण समतोल (बॅलन्स) असते. अशा बिंदूंना ‘लँगरेंज पॉइंट’ म्हटले जाते. इटालियन संशोधक जोसेफ लुई लँगरेंज यांच्या स्मरणार्थ हे नाव देण्यात आले आहे.
  • सूर्य आणि पृथ्वीदरम्यान आतापर्यंत असे पाच बिंदू खगोल अभ्यासकांना सापडले असून त्यांना ‘एल-१’, ‘एल-२’, ‘एल-३’, ‘एल-४’ आणि ‘एल-५’ अशी नावे देण्यात आली आहेत.
  • ‘आदित्य’ हे अंतराळयान एल-१ या बिंदूजवळून सूर्याचा अभ्यास करणार असल्याने मोहिमेचे नाव ‘आदित्य एल-१’ असे ठेवण्यात आले आहे.
  • अलीकडेच ‘नासा’ आणि ‘युरोपियन स्पेस एजन्सी’ने (ईएसए) संयुक्तपणे काढलेल्या ‘सोलर ऑर्बिटर’ मोहिमेतून तुलनेने लहान सौरवाऱ्यांचा शोध लागला होता. आदित्यच्या निरीक्षणांमधून यावर अधिक प्रकाश पडेल, अशी संशोधकांना अपेक्षा आहे.

या अवकाश यानाला अचूक कक्षेत प्रस्थापित केले आहे. १८ सप्टेंबरनंतर हे यान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून ‘एल-१’ या बिंदूच्या दिशेने प्रवास सुरू करेल. ही मोहीम नक्कीच यशस्वी होईल. – एस. सोमनाथ,  ‘इस्रो’चे प्रमुख

भारताच्या पहिल्या सौर मोहिमेंतर्गत ‘आदित्य-एल-१’चे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल आपल्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदन! अवघ्या मानवतेच्या कल्याणासाठी आणि अवकाशाबाबत अधिक चांगले ज्ञान विकसित करण्यासाठी आमचे वैज्ञानिक अथक प्रयत्न सुरूच ठेवतील.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

‘आदित्य-एल १च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील (इस्रो) कठोर परिश्रम करणारे शास्त्रज्ञ, अंतराळ अभियंते, संशोधक व इतर कर्मचाऱ्यांचे आम्ही ऋणी आहोत. आम्ही सर्व जण मिळून त्यांचे यश आणि सन्मान आमच्या कृतज्ञतेसह साजरे करत आहोत. मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे अध्यक्ष

आदित्य एल-१ या भारताच्या पहिल्या सौर मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणाचा देशाला अभिमान आणि आनंद वाटतो. आपल्या शास्त्रज्ञांनी वेळोवेळी आपले सामथ्र्य आणि प्रज्ञा सिद्ध केली आहे. ‘आदित्य-एल १ च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल मी सर्व शास्त्रज्ञांचे आणि पंतप्रधानांचे  अभिनंदन करतो. – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतासाठी हा खरोखरच सूर्यप्रकाशासारखा झळाळता क्षण आहे.आमचे शास्त्रज्ञ वर्षांनुवर्षे रात्रंदिवस मेहनत करत आहेत याचे प्रतिक ही मोहीम आहे. ‘आदित्य एल-१’चे यशस्वी प्रक्षेपण अवकाश विज्ञानाच्या प्रगतीची आणि संपूर्ण राष्ट्राच्या दृष्टिकोनाची साक्ष देते. -जितेंद्र सिंह, केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री