Ahmedabad Plane Crash: अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत २४१ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला..मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावल्याचं दु:ख अजूनही पचवता आलेलं नाही. त्यांच्यासाठी या अपघाताचा धक्का इतका भयंकर होता की जणूकाही विमान नाही, आकाशच अहमदाबादच्या मेघानीनगरमध्ये कोसळलं होतं! घटनास्थळी जितकं भीषण दृश्य होतं, त्याहून भयंकर आणि विदारक दृश्य आता अहमदाबादमधील रुग्णालयांमध्ये दिसू लागलं आहे. ज्या डोळ्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना जिवंतपणी विमानतळावर निरोप दिला होता, त्या डोळ्यांना आता त्याच व्यक्तीच्या मृतदेहाची वाट पाहावी लागत आहे. थिजलेल्या डोळ्यांनी आणि भिजलेल्या मनांनी हे सर्व नातेवाईक रुग्णालयांमध्ये जागा मिळेल तिथे बसून आहेत…वाट पाहात!
अहमदाबादच्या कसौटी भवन परिसरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हीच परिस्थिती पाहायला मिळतेय. विमान दुर्घटनेत अनेक मृतदेह ओळखण्याच्याही पलीकडे जळाले आहेत. त्यामुळे नेमका कोणता मृतदेह कोणत्या व्यक्तीचा हेही ओळखणं रुग्णालय प्रशासनासाठी दुरापास्त ठरलंय. नातेवाईकांसाठी तर गुरुवार १२ जूनपासून सुरू झालेलं दु:स्वप्न तर संपण्याचं नावच घेत नाहीये. आपला कोण, दुसरा कोण हे ओळखण्यासाठी डीएनए चाचणी आणि त्यासाठी रुग्णालयांमध्ये या नातेवाईकांची रीघ लागली. चाचणीचे निष्कर्ष येण्यासाठी ७२ तासांचा अवधी, पण नातेवाईकांसाठी हे ७२ तास म्हणजे ७२ जन्मांची शिक्षाच ठरू लागली.
सुरतचे अब्दुल्ला नानाबावा यांचा मुलगा अकील, सून हॅना वोरजी आणि चार वर्षांची नात सारा एअर इंडियाच्या AI171 या बोईंग ७८७-८ श्रेणीतील विमानात होते. विमान अपघातग्रस्त झाल्याचं कळताच अब्दुल्ला यांच्यासाठी तो भीषण धक्का होता. अपघाताच्या काही तास आधीच आपल्या मुलाला, सुनेला आणि नातीला निरोप दिलेले अब्दुल्ला आता कसौटी भवनमधील रुग्णालयाच्या परिसरात त्यांच्या कुटुंबीयांसोबत आणि मित्र परिवारासोबत वाट पाहताना दिसतात.
“जोपर्यंत मला घरी घेऊन येण्यासाठी काही मिळत नाही, तोपर्यंत मी घरी येणार नाही”… नानाबावा फोनवर आपल्या एका नातेवाईकाला सांगत होते. त्यांच्या इतर कुटुंबीयांनी आणि मित्र परिवाराने रुग्णालयाजवळच कुठेतरी राहण्यासाठी व्यवस्था केली. पण फक्त रात्री झोपण्यासाठी. दुसऱ्या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत पुन्हा रुग्णालयातली प्रतीक्षा!
समदु:खी, सहवेदना आणि धीर!
अत्यंत जवळच्या व्यक्तींना गमावल्यामुळे रुग्णालयात उपस्थित प्रत्येक नातेवाईकाच्या मनात प्रचंड कालवाकालव चालू असतानाच त्यातलेच काही त्यातल्याच काहींना धीर देताना दिसत आहेत. एकमेकांची काळजी घेताना दिसत आहेत. “जेवलात का?”, “चहा घेतलात का?” अशी आस्थेवाईकपणे चौकशी करताना दिसत आहेत. नानाबावांसारखेच असंख्य नातेवाईक रुग्णालयाच्या आवारात दिसतात..कधी रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांशी तर कधी फोनवरच्या आप्तस्वकीयांशी बोलताना.. कधीतरी अचानक ही सगळी तणावपूर्ण शांतता आणि मनातला कोलाहल भेदून जाणारा आवाज वरून येतो. कुठलंतरी विमान कुठेतरी जातानाचा तो आवाज प्रत्येकाच्या काळजात धस्स करणारा असतो!
या नातेवाईंकांना मानसिक बळ आणि आधार देण्यासाठी जिल्हा प्रशासनानं पुढाकार घेऊन प्रत्येक कुटुंबागणिक एक अशा समुपदेशकांना जबाबदारी सोपवली आहे. हेच समुपदेशक कुटुंबीयांचं सांत्वनही करत आहेत, त्यांना धीरही देत आहेत आणि एखाद्या मृतदेहाची ओळख पटलीच, तर त्या कुटुंबाला अंत्यसंस्काराच्या प्रक्रियेत मदतही करत आहेत.
रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी सांगतात, “रुग्णालयात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याचे नातेवाईक अंत्यसंस्काराच्या प्रक्रियेसाठी एकत्र येत असतात. पण इथे परिस्थिती वेगळी आहे. काही नातेवाईक रुग्णालयात मृतदेह मिळण्याची वाट पाहात आहेत, तर काही नातेवाईक घरी त्यांची वाट पाहात आहेत. त्यामुळे हे सगळं जुळवून आणणं हे आमच्यासाठी एक मोठं आव्हान आहे. मृतदेहांची ओळख पटवण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत”.
घरी नाही, रुग्णालयातच प्रतीक्षा..७२ तास का असेना!
नानाबावा यांच्यापासून थोड्याच अंतरावर एका बाकावर अनिल पटेल बसले होते. अनिल पटेल हे एक सुरक्षा पर्यवेक्षक आहेत. त्यांचा मुलगा हर्षित आणि सून पूजा लेसेस्टरहून त्यांना भेटण्यासाठी आले होते. पण पुन्हा लंडनला परतलेच नाहीत. अपघाताच्या दिवशी रात्री ९ च्या सुमारास पटेल यांना रुग्णालयातून समजलं की त्यांच्या डीएनएचे रिपोर्ट यायला ७२ तास लागतील. पण तरीदेखील अनिल पटेल दररोज सकाळी रुग्णालयात येतच राहिले.
“त्या दिवशी मध्यरात्रीनंतर मला अचानक अनिल पटेल यांचा फोन आला. त्यांना रुग्णालयात परत जायचं होतं. मी त्यांना सांगितलं की आपल्याला डीएनए चाचणीच्या रिपोर्टसाठी ७२ तास वाट पाहावी लागेल. तर त्यावर ते म्हणाले, ‘माझ्या मुलाचं शरीर जिथे आहे, तिथेच मला थांबायचं आहे’.. मी त्यांना कसंतरी दुसऱ्या दिवशी सकाळी रुग्णालयात नेण्यासाठी राजी केलं”, अनिल पटेल यांचे मित्र आणि कामावरचे सहकारी राजेश वाघेला ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगत होते.
“मी काय करू? मला घरी जावंसंच वाटत नाही”
शनिवारी सकाळी पुन्हा अनिल पटेल ९ वाजता रुग्णालयाच्या आवारात दिसले. डीएनए चाचणीचा अहवाल कधी येणार हे डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण तरीही पटेल वाट पाहात होते..जणूकाही फक्त वाट पाहाणंच त्यांच्या आयुष्याचं ध्येय उरलं होतं. अखंडपणे वाहणाऱ्या आपल्या अश्रूंना पुसण्याचा अयशस्वी प्रयत्न करत पटेल म्हणाले, “मी काय करू? मला घरी जावंसंच वाटत नाही”!
सहा वर्षांपूर्वी अनिल पटेल यांची अर्धांगिणी कर्करोगाशी झुंज अपयशी ठरल्यामुळे त्यांना सोडून गेली. तेव्हापासून पटेल एकटेच राहतात. त्यांची मुलगी तिच्या सासरी अहमदाबादमध्येच राहते. त्यांचे इतर कुटुंबीय आणि नातेवाईकही तिथे असतात. पण जेव्हा जेव्हा रुग्णालयात मृतदेह ताब्यात देण्याची प्रक्रिया होते, तेव्हा तेव्हा तिथेच उपस्थित असण्याचा पटेल यांचा आग्रह होता.
शनिवारी अनिल पटेल यांना रुग्णालयातून फोन आला. एका मृतदेहाशी त्यांचा डीएनए जुळला होता. मुलाचा मृतदेह सापडला होता. अक्षरश: संयमाची पराकोटीची परीक्षा पाहणाऱ्या काळानंतर पोटच्या मुलाचा मृतदेह हाती आला तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून अविरतपणे वाहणाऱ्या अश्रूंनी सगळे अवरोध झिडकारले होते!
पण यानंतरही अनिल पटेल यांची प्रतीक्षा संपलेली नाही. अजूनही सुनेचा मृतदेह सापडला नव्हता. डीएनए चाचणीचा अहवाल आलेला नव्हता. वाहत्या डोळ्यांनी पटेल म्हणाले, “आम्ही त्यांना दोन्ही मृतदेह एकत्रच देण्याची विनंती केली आहे. म्हणजे आम्हाला त्या दोघांवर अंत्यसंस्कार एकत्रच करता येतील”. रविवारचा पूर्ण दिवस वाट पाहिल्यानंतर संध्याकाळी उशीरा पटेल यांना दुसऱ्या दिवशी पुन्हा येण्यास सांगितलं गेलं.
अहमदाबादमधल्या ज्या ज्या रुग्णालयांत मृतदेह नेण्यात आले, त्या सर्व रुग्णालयांमध्ये अशीच काहीशी स्थिती, अपघातग्रस्तांच्या अशाच काळीच पिळवटून टाकणाऱ्या कथा आणि दिवस-रात्र प्रतीक्षा करणारे त्यांचे डोळे हेच चित्र आहे…आणि या अपघातामुळे त्यांच्या हृदयाला झालेल्या जखमांची भळभळ त्यांच्या त्या डोळ्यांमधून अविरतपणे वाहते आहे!